नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याच्या दरात घट झाल्यामुळे भारतीय बाजारातही सोमवारी सोन्याच्या दरात घट नोंदली गेली. दिल्ली सराफ सोन्याचा दर 124 रुपयांनी कमी होऊन 47,917 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 18 रुपयांनी कमी होऊन 66,473 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
यासंदर्भात एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारपेठेतील संकेतानुसार वायदे बाजारात सोन्याच्या दरात घट झाली. त्या प्रमाणात स्पॉट मार्केटमध्ये सोने आणि चांदीच्या दरात घट नोंदली गेली.
जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1808 डॉलर तर चांदीचा दर 25.47 डॉलर प्रति औस या पातळीवर गेला. सध्या सोने आणि चांदीचे दर तुलनेने कमी आहेत. त्यामुळे दीर्घ पल्ल्याचा विचार करून गुंतवणूक करणाऱ्यासाठी सोने खरेदी फायदेशीर ठरू शकते असे बऱ्याच विश्लेषकांना वाटते.