शाहरुख खान सध्या आपल्या “पठाण’ या आगामी सिनेमाच्या कामामध्ये खूप व्यस्त आहे. शाहरुखच्या वाट्याला बऱ्याच दिवसांनी ऍक्शन फिल्म आल्यामुळे त्याचे फॅन्सदेखील खूश आहेत. यामध्ये शाहरुखबरोबर असलेल्या दीपिकाने काही दिवसांपूर्वीच आपल्या वाटणीचे शूटिंग सुरू केले आहे. या रोलसाठी दीपिका कठोर मेहनत घेते आहे, असे समजले आहे.
दीपिकासाठी हा पहिलाच ऍक्शन पॅक्ड रोल असणार आहे. सध्या दीपिका दररोज दोन तास कसून व्यायाम आणि फाईट प्रॅक्टिस करते आहे. तिला या ट्रेनिंग दरम्यान योगाभ्यास देखील शिकवला जातो आहे. तिच्यासाठी खास डाएट प्लॅन तयार केला गेला आहे. काही दिवसांपूर्वी दीपिकाला करोनाचा संसर्ग झाला होता.
त्यामुळे थोडी अशक्त झालेल्या दीपिकाला आपल्या फिटनेस आणि तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे लागते आहे. ऍक्शन सीन करताना कोणताही थकवा जाणवायला नको यासाठी लवकरात लवकर एकदम फिट होण्याचा दीपिकाचा प्रयत्न आहे. दीपिका सध्या 83, महाभारत आणि नाग अश्विनच्या आगामी सिनेमामध्येही काम करते आहे. त्या सिनेमांच्या शूटिंगसाठी एनर्जी कायम राहावी यासाठीही दीपिकाला फिटनेसवर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे.