बीजिंग – युरोपापाठोपाठ आता चीनलाही मुसळधार पावसाने झोडपले आहे. चीनमध्ये आलेल्या पूरामुळे आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. मरण पावणाऱ्यांमध्ये भुयारी रेल्वेतील 12 प्रवाशांचाही समावेश आहे.
चीनमधील मध्यवर्ती हेनान प्रांतात गेल्या एक हजार वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पूरामुळे भुयारी मार्गांमध्ये पाणी साचून शेकडोजण अडकून पडल्याची भीती आहे. भुयारी मार्ग, हॉटेल आणि विविध ठिकाणांवर अडकलेल्या या सर्वांना सोडवण्यासाठी अध्यक्ष शी जिनपिंग यांनी लष्कराला तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.
या पूराचा फटका तब्बल 12 लाखांपेक्षा अधिक नागरिकांना बसला आहे. दिड लाखांपेक्षा अधिक लोकांना पूराच्या पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
या पूरामध्ये एकूण 25 जणांचा मृत्यू झाला आहे आणि अन्य 7 जण बापत्ता झाले आहेत, असे सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
मंगळवारी रात्री भुयारी रेल्वे स्थानकामध्ये पाणी शिरल्याने 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर भिंत कोसळल्याने अन्य दोघांचा मृत्यू झाला. प्रचंड पावसामुळे रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. जवळपास 80 मार्गांवरील वाहतूकही स्थगित करण्यात आली आहे.
तर भुयारी मार्गाची वाहतुक तात्पुरती स्थगित केली गेली आहे. झेंगोडोंग रेल्वे स्टेशनवरच्या तब्बल 160 रेल्वे थांबवण्यात आल्या आहेत. झेंगझोऊ या हेनान प्रांताच्या राजघानीमध्ये एवढा प्रचंड पाऊस झाल्याची नोंद गेल्या 1 हजार वर्षांमध्ये तरी नव्हती.