पुणे : समाजातील प्रत्येक घर माझं आहे आणि त्या घरातील प्रत्येक व्यक्ती शिकली पाहिजे, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून महात्मा जोतीराव फुले यांनी पुण्यात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. महात्मा फुले यांचा हाच वसा आणि विचार पुढे नेण्याचे काम नगरसेवक धीरज घाटे हे करीत आहेत, याचा मला आनंद आहे. केवळ पैशांमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबणार नाही, यासाठी फक्त भाषणबाजी न करता प्रत्यक्ष कृती करणाऱ्या धीरज घाटे यांच्या कामाचा आदर्श सर्वांनी घ्यायला हवा, अशा शब्दात माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी घाटे यांनी सुरू केलेल्या शिष्यवृत्ती योजनेचे कौतुक केले. माजी सभागृ नेते घाटे यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी आणि साने गुरुजी तरुण मंडळाच्या वतीने पुण्याच्या वेगवेगळ्या भागातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी मदत म्हणून सेवाभावी शिक्षक दिवंगत संजय घुगे यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्ती वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
संजय घुगे शिष्यवृत्ती सहाय्य योजनेच्या माध्यमातून एकूण तीनशे विद्यार्थ्यांना अकरा लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. कार्यक्रमात प्रातिनिधिक काही विद्यार्थी-विद्यार्थिनींना मदतीचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, आमदार मुक्ता टिळक, भाजपाचे पुणे शहर सरचिटणीस राजेश पांडे, नगरसेवक सरस्वती शेंडगे, स्मिता वस्ते, रघुनाथ गौडा, अजय खेडेकर, माजी नगरसेविका मनिषा घाटे,कसबा मतदार संघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे,पर्वती मतदार संघाचे अध्यक्ष जितेंद्र पोळेकर उपस्थित होते.
यावेळी संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांनी या उपक्रमचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी अशीच सहकर्याची भावना घेऊन पुढील काळात आपले शिक्षण पूर्ण करावे असे आवाहन करून करोनाच्या संकट काळात आपले कर्तव्यही विद्यार्थ्यांनी पाळले पाहिजे असे संदेश दिला.
तर साने गुरुजी तरुण मंडळ गेल्या वीस वर्षांपासून शैक्षणिक उपक्रम राबवित आहे. गेली वीस वर्षे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला आणि दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येतो. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे आम्ही हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आणि गरीब विद्यार्थ्यांची जबाबदारी उचलली, असे धीरज घाटे यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले. भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहरातील नगरसेवकांनी पूर्ण शहरात हा उपक्रम राबविण्याची आवश्यकता असल्याच्या भावना घाटे यांनी यावेळी व्यक्त केल्या.