कराड -कराड नगरपालिकेच्या कारभारात नगरसेवक व पदाधिकारी महिलांचे पती व नातेवाईकांचा हस्तक्षेप गेल्या चार वर्षापासून सुरू आहे. परंतु, नुकत्याच झालेल्या मासिक सभेत हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.
यावरून होणारे राजकारण थोपवण्यासाठी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी पुढकार घेत प्रत्येक विभाग प्रमुखाकडून अहवाल मागविला आहे. मात्र, या प्रकरणी कारवाई होणार की अहवाल मागवून नुसताच कारवाईचा फास असणार हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.
कराड पालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे पालिकेतील राजकारण गतीत झाले असून अनेक इच्छुक तयारीलाही लागले आहेत. विविध माध्यमांतून एकमेकांवर मात करण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत. गेल्या चार वर्षात सो-सो चालणाऱ्या मासिक सभांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत.
परवाची मासिक सभा नगरसेविकेच्या पतींच्या उचापतींवरून गाजली. त्यात झालेल्या आरोपांनी सभेत व त्यानंतरही वातावरण गरम झाले आहे. राजकीय वातावरणही त्याच मुद्द्याभोवती गाजणार आहे. पालिकेतील महिला नगरसेविकांचे केवळ पतीच नव्हे तर अन्य नातेवाईकांच्या कारभारातील हस्तक्षेपाला आता थेट आव्हान दिले जाणार आहे. परवाच्या वादाने खऱ्या अर्थाने हस्तक्षेप प्रकाशात आला. नगरसेविकांचे पती, काहींचे चिंरजीव तर काहींचे दीर पालिकेत सक्रिय आहेत.
त्यांच्याकडून निविदा “मॅनेज’ केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे त्या महिला नगरसेविका स्वाक्षरीच्या धनी आहेत. परवाचा महिला नगरसेविकांचा वाद त्याच मुद्द्यांभोवती फिरला. नगरसेविकांच्या नातेवाईकांची पालिकेतील रोजची उठबस, कारभारातील हस्तक्षेप, निविदा “मॅनेज’ करण्यातील दलाली, काहींच्या नातेवाईकांकडे परहस्ते असलेल्या निविदा, जवळच्या नातेवाईकाला दिली जाणारी कामे, काही नातेवाईकांना थेट दिलेली नोकरी, त्याची मुदतवाढ असे सारे प्रकार चर्चेत आहेत. त्यावरून आरोपांच्या फैरी झडत आहेत.
गेली साडेचार वर्षे हे कसे काय चालले?
पालिकेत साडेचार वर्षांपासून हे सारे कायदेशीर होते. मात्र, आता पालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर ते सारे साऱ्यांनाच बेकायदेशीर वाटू लागले आहे. नगरसेवकपदाचा गैरवापर असल्याचा साक्षात्कार झाला आहे. विकासकामे ठरविण्यात नातेवाईकांचा हस्तक्षेप गैर ठरविण्यावरून आरोप होत आहेत. साडेचार वर्षांत ते सारे गैर का वाटले नाही, ते चुकीचे का वाटले नाही, याची उत्तरे प्रत्येकालाच सामान्यांना येणाऱ्या निवडणुकीत देणे क्रमप्राप्त आहे.