शांघाय, (चीन) – चीनच्या वायव्येकडील इनर मंगोलिया या स्वायत्त प्रांतातील दोन धरणे मुसळधार पावसामुळे कोसळली आहेत. चीनमधील जल मंत्रालयाने आज ही माहिती दिली. उन्हाळ्यात येणाऱ्या पूरामुळे जुन्या बांधकामांवर ताण येऊ लागला असल्याचे या दुर्घटनेमुळे स्पष्ट झाले आहे.
इनर मंगोलिया प्रांतातील हुलुनबर या शहरातील ही दोन्ही धरणे रविवारी दुपारच्या सुमारास कोसळली. या दोन्ही धरणांमध्ये मिळून 46 दशलक्ष घन मीटर इतक्या जलसाठ्याची क्षमता होती, असे जलस्रोत मंत्रालयाने सांगितले.
या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना त्वरित दुसरीकडे हलवण्यात आले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.
गेल्या आठवड्याभरापासून हुलूनबर शहराच्या परिसरामध्ये सरासरी 87 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मोरीन दावा पर्जन्य देखरेख केंद्रामध्ये 223 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, असेही मंत्रालयाने म्हटल आहे.
हुलुनबर शहरातील 16,660 नागरिकांना दुसरीकडे हलवण्यात आले आहे. तर 53,807 एकरातील शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. पूल आणि अन्य पायाभूत सुविधाही विस्कळीत झाल्या आहेत. दोनपैकी एक धरण पूर्णपणे वाहून गेल्याचे चीनमधील सोशल मिडीयावर पोस्ट झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
चीनमध्ये तब्बल 98 हजार जलाशय असून त्यापैकी 80 टक्क्यांपैकी अधिक धरणे चार दशकांपूर्वीची आहेत. त्यापैकी काही धरणांचे बांधकाम आता धोकादायक झाले आहे, असे सरकारने म्हटले आहे.
जगाच्या अनेक भागांमध्ये नैसर्गिक आपत्ती दिसून येत आहेत. युरोपातही अनेक अतिवृष्टीमुळे पूर आला आहे. तर दुसरीकडे उत्तर अमेरिकात उष्णतेची लाट आली आहे. हे सर्व हवानमान बदलाचे दुष्परिणाम आहेत.