नवी दिल्ली – पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरु असतानाच आज नवजोत सिंह सिद्धू यांनी केलेल्या एका ट्विटमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. सिद्धू यांनी केलेल्या ट्विटद्वारे, ते पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी आम आदमी पक्षाचा झेंडा हाती घेतील असे स्पष्ट संकेत मिळताहेत.
पंजाबमध्ये मुख्यमंत्री अमरिंदर सिंह व नवजोत सिंह सिद्धू यांच्यादरम्यान राजकीय कलह निर्माण झाला आहे. अशातच आज सिद्धू यांनी ट्विट करत, ‘पंजाबमध्ये विरोधी पक्ष असलेल्या आम आदमी पक्षाने नेहमीच माझ्या धोरणांना व व्हिजनला मान्यता दिली आहे. मग ते २०१७ पूर्वीचे गुरु ग्रंथ साहिब अवमान प्रकरण असो, ड्रग्सचा मुद्दा असो किंवा भ्रष्टाचार आणि वीज संकटाचा प्रश्न असो. मी आज आणि यापूर्वी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना आम आदमी पक्षाने मान्यता दिली आहे. मी आज जेव्हा पंजाब मॉडेल प्रसिद्ध करतोय तेव्हा हे साफ होतंय की कोण पंजाबसाठी लढा देतंय.
सिद्धू यांनी या ट्विटसोबतच एक जुना व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये आप नेते भगवंत मान सिद्धू यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसतायेत. तसेच सिद्धू हे अत्यंत प्रामाणिक असल्याचंही ते सांगतायेत. तसेच आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह त्यांचे आम आदमी पक्षात स्वागतच असेल असं म्हणत आहेत. भगवंत मान हे आम आदमी पक्ष पंजाबचे अध्यक्ष आहेत.
तत्पूर्वी, आम आदमी पक्ष पंजाबच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक ट्विट करण्यात आलं होत. या ट्विटमध्ये सिद्धू यांना टॅग करत, ‘तुम्ही जे मुद्दे याआधी उपस्थित करत होतात त्या मुद्यांवर आता किमान ट्विट तरी करा’ असं म्हंटल होत.
पंजाब काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत कलहाचा फटका आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला बसू नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सिद्धू यांना पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी देऊन हा वाद मिटवण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याची माहिती सुत्रांकरवी मिळाली आहे.
Our opposition AAP has always recognised my vision & work for Punjab. Be it Before 2017- Beadbi, Drugs, Farmers Issues, Corruption & Power Crisis faced by People of Punjab raised by me or today as I present “Punjab Model” It is clear they know – who is really fighting for Punjab. https://t.co/6AmEYhSP67 pic.twitter.com/7udIIGkq1l
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) July 13, 2021