पुणे -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे द्वितीय सत्राच्या परीक्षा सोमवारपासून (दि.12) सुरू होत आहे. यासाठी एकूण 6 लाख 18 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. पहिल्या दिवशी 76 हजार 804 विद्यार्थी 74 विषयांची परीक्षा देणार आहेत.
ही परीक्षा ऑनलाइन व प्रॉक्टर्ड पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांना सराव परीक्षेची संधी देण्यात आली होती. “एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशन’ विद्यापीठाच्या कंपनीमार्फतच द्वितीय सत्राची परीक्षा घेण्यात येत आहे.
विद्यापीठाने परीक्षेसाठी आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. “एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशन’ कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी विद्यार्थ्यांना परीक्षा देताना कोणतीही अडचण येऊ नये, याबाबत खबरदारी घेत आहेत.
लॉग-इनसंदर्भात काही अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी 48 तासांच्या आत विद्यापीठाकडे ऑनलाइन पद्धतीने तक्रार नोंदविणे आवश्यक आहे. परीक्षाबाबत कोणतीही अडचण आल्यास हेल्पलाइन क्रमांकावर किंवा चॅट बॉक्सद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केले आहे.