मुंबई : ओबीसींच्या आरक्षणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यास घेणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांच्या घोषणेचा शेलक्या शब्दात समाचार घेतला.
“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं तुम्ही फार गांभीर्याने घेतलं. ते म्हणाले होते स्वतंत्र विदर्भ होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा सोडवू, असंही म्हणाले होते. त्यानंतर आता ओबीसी आरक्षण मिळवून दिलं नाही, तर संन्यास घेईन म्हणतात; मात्र यापैकी काही झालं नाही”, असा टोला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
“सत्तेसाठी काहीही बोलायचं, नंतर कृती करायची नाही; हा भाजपाचा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे. जनमाणसाला फसवणं आणि सत्ता मिळवणं हा उद्देश ठेवून ते अशी वक्तव्य करतात,” अशी टीका थोरात यांनी केली.
ओबीसींच्या स्थगित करण्यात आलेल्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपाच्या वतीने २६ जून रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावेळी “राज्याची सूत्रे भारतीय जनता पक्षाकडे सोपविली तर दोन ते तीन महिन्यांत ओबीसी आरक्षण परत मिळवून देतो आणि जर मी हे करू शकलो नाही तर राजकीय संन्यास घेईन,” असं फडणवीस म्हणाले होते.