मुंबई: राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जोर धरू लागला आहे. त्यासाठी भाजपकडून राज्यभरात आंदोलने होत आहेत.याच मुद्द्यावरून वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो, असं म्हणत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी लोणावळ्यात पार पडलेल्या ओबीसी चिंतन बैठकीतून शिवसेनेला टोला लगावला होता. विजय वडेट्टीवार यांच्या या विधानानंतर भाजपाचे नेते नितेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीका केली आहे.
नितेश राणे यांनी या संबंधी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी, “मंत्री महोदय म्हणतात, आमच्या इशाऱ्यावर वाघ चालतो. इशाऱ्यावर चालणारा वाघ एकतर सर्कसमध्ये असतो. नाहीतर तो वाघच नसतो. त्याला पालतू कुत्रा म्हणतात”, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. तसेच बाकी समझदारोंको इशारा काफी है, असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे.
मंत्री महोदय म्हणतात, आमच्या इशाऱ्यावर वाघ चालतो..
इशाऱ्यावर चालणारा वाघ एकतर सर्कस मध्ये असतो..
नाहीतर तो वाघच नसतो..
त्याला पालतू कुत्रा म्हणतात!!बाकी समझदारोंको इशारा काफी है!!!
— nitesh rane (@NiteshNRane) June 28, 2021
तत्पूर्वी, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोणावळा येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची परिषद दोन दिवसांसाठी भरवण्यात आली होती. या परिषदेची रविवारी सांगता झाली. त्यादरम्यान सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील ओबीसी नेते या परिषदेला उपस्थित होते. या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेचे नाव न घेता त्यांना खोचक टोला लगावल्याचे पाहायला मिळाले.
विजय वडेट्टीवार यांनी मी अशा भागातील राहतो जेथे भरपूर वाघ आहेत. त्यामुळे मी माझ्या खात्यात पैसे आले तर परत जाऊ देणार नाही, असे म्हटले. यावर मंचावर बसलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वाघ नाना पटोले यांच्याकडेही पाठवा असे सांगितले. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी आम्ही वाघ पाठवू, पण तो वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो. कारण तो आमचा वाघ आहे, असे म्हणत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला टोला लगावला. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला होता.