पुणे: पुणे-मुंबई मार्गावरील प्रवाशांच्या सेवेत विशेष डेक्कन एक्स्प्रेस ही आता “विस्टाडोम कोच’सह सेवेत आजपासून दाखल झाली आहे. या ट्रेनला सर्वसामान्य प्रवासी डबेदेखील असतील. लोणावळा-खंडाळा येथील निसर्गसौंदर्य, पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर असणारे अनेक धबधबे, बोगदे, माथेरानचा डोंगर, सोनगीर हिल, उल्हास नदी, उल्हास व्हॅली अशी निसर्गसौंदर्याने नटलेली ठिकाणे पाहण्याचा आनंद रेल्वे प्रवाशांना घेता येणार आहे.
“विस्टाडोम कोच’सह रेल्वेसेवा सध्या मुंबई-मडगाव जनशताब्दी विशेष ट्रेनमध्ये जोडलेला आहे. त्याला प्रवासी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. “विस्टाडोम’ बोगीत मोठ्या खिडक्या आणि काचेचे छप्पर. राउंड शेप आणि पुशबॅक सुविधांच्या खुर्च्या, संपूूर्ण वातानुकूलित, स्वच्छता आणि टापटीपपणा अशा सर्व सुविधा या रेल्वेत असणार आहेत. दरम्यान, दादर, ठाणे, कल्याण, नेरळ, लोणावळा, तळेगाव, खडकी,शिवाजीनगर या ठिकाणी या रेल्वेला थांबा असणार आहे.
मुंबई-पुणे दरम्यान प्रवाशांना लोणावळा, खंडाळा, घाटातील निसर्गाची मज्जा लुटता यावी यासाठी या मार्गावरील डेक्कन एक्स्प्रेसला ‘विस्टाडोम कोच’ लावण्यात आलेले आहेत. तसेच रोटेबल सिटमधून प्रवाशांना १८० डिग्रीमध्ये निसर्ग पाहता येईल. शिवाय अनेक सुविधा या कोचमध्ये देण्यात आले आहेत.