अजय देवगणला आता बॉलीवूडमध्ये तीन दशके झाली आहेत. वडील चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. मात्र, ते कोणी मोठे निर्माते अथवा दिग्दर्शक नव्हते. कोणी गॉडफादर नसताना या काळात अजयने केलेला प्रवास थक्क करणारा आहे.
त्याचे कारण कोणा चोप्रा अथवा जोहर कॅम्पमध्ये काम न करता अथवा त्यांच्या मागेपुढे न करता त्याने आज जे काही यश मिळवले आहे, ते स्वत:च्या हिमतीवर. टॅलेंटवर आणि कष्टावर. अजयचा विषय निघण्याचे कारण त्याने नुकताच एका ठिकाणी पहिला क्रमांक पटकावला आहे. यात त्याने सलमान आणि साऊथचे सुपरस्टार इतकेच काय अमिताभ बच्चन यांनाही मागे टाकले आहे.
गेल्या बारा महिन्यांत युट्यूबवर कोणत्या सेलिब्रिटीला सगळ्यांत जास्त सर्च करण्यात आले होते, त्याचा आढावा घेण्यात आला. त्यात अजयने बाजी मारली आहे. सामान्यत: गुगलवर अथवा अन्य प्लॅटफॉर्मवर सेलिब्रिटींना सर्च केले जात असते. त्यावरून त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाजही बांधता येत असतो. बॉलीवूडमध्ये खानदान मोठे आहे.
त्यांच्यानंतर हृतिक आणि आताचे रणबीर आणि रणवीर यांची नावे घेतली जातात. अजय आणि अक्षय यांनी कोणत्या एका कॅम्पचे कुंकू कपाळाला लावलेले नाही किंवा स्वत:चा गोतावळाही तयार केलेला नाही. आपण भले आणि आपले काम बरे यानुसार त्यांची वाटचाल असते. तरीही अजयने पहिले स्थान पटकावले आहे. या यादीत सलमान दुसऱ्या, बच्चन तिसऱ्या, अल्लू अर्जुन चौथ्या तर थलपती विजय पाचव्या स्थानावर आहे. अजयला शुभेच्छा.