नवी दिल्ली – कोविड -19 लस घेतलेल्या ग्राहकांसाठी एक हजार रुपयांची फ्री खरेदी ऑफर करणार असल्याचे मेन्सवेअर ब्रँड पीटर इंग्लंडने जाहिर केले आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लसीकरण मोहिम चालू आहे. लसीकरणाच्या जनजागृतीमध्ये सरकारसह खासगी कंपन्यांनी सुद्धा सहभाग नोंदविल्याचे यामधून दिसून येत आहे.
या योजनेअंतर्गत, ग्राहकांनी पीटर इंग्लंडकडून 1,999 रुपयांची खरेदी केल्यास आणि त्यांना आधीच लस मिळाली असल्यास पीटर इंग्लंडच्या शोरूममध्ये या विशेष ऑफरचा लाभ घेऊ शकतात. त्यांना फक्त त्यांच्या आधार कार्डसह लसीकरणाचा पुरावा दाखविणे गरजेचे आहे, किंवा CoWin Screengrab , व्हॅक्सीन सर्टिफिकेट या पुराव्यांच्या आधारे या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता.
पीटर इंग्लंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष सिंघई म्हणाले, ‘आम्ही ओळखतो की, एक समुदाय म्हणून आपण जागतिक पातळीवर आपत्तीजनक साथीचा सामना करीत आहोत आणि देशभरातील लसीकरण चळवळीला चालना देणे ही आपली जबाबदारी आहे असे आम्हाला वाटते. पीटर इंग्लंडच्या या पुढाकाराने आमच्या संरक्षकांचे कल्याण सुनिश्चित करण्याचे आमचे ध्येय आहे.’
या योजनेसंदर्भात माहिती देताना पीटर इंग्लंडने सांगितले की, ते खरेदीच्या वेळी लागू असलेल्या इतर सवलती व्यतिरिक्त एक वेळ सवलत देईल. ज्या ग्राहकांना त्यांच्या पहिल्या लसीचा डोस मिळाला आहे ते देखील 30 जून 2021 पर्यंत हा लाभ घेण्यास पात्र आहेत. या कॅम्पेनला पुढे नेण्यासाठी त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #TimetoVaccinate हॅशटॅग सुरू केले आहे.