बेलग्रेड – बेलग्रेड आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भारताच्या साजन प्रकाश आणि श्रीहरी नटराज यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. मात्र, तरीही त्यांना टोकियो ऑलिम्पिकचे निकष पूर्ण करण्यात अपयश आल्याने पात्रता मिळवता आली नाही.
आंतरराष्ट्रीय जलतरण महासंघाच्या (फिना) ऑलिम्पिक पात्रता जलतरण स्पर्धेतील 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात प्रकाशने 1:56.96 सेकंद वेळ नोंदवली आणि स्वत:चाच 2018 सालातील राष्ट्रीय विक्रम मोडला.
मात्र, साजनला ऑलिम्पिकचे अ निकष पूर्ण करण्यात अवघ्या 0.48 सेकंदांनी अपयश आले. नटराजने 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात 54.45 सेकंद अशी वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. पण त्यालाही ऑलिम्पिकच्या अ निकषांची पूर्तता करता आली नाही.
प्रकाश, नटराज यांनी अनुक्रमे 200 मीटर बटरफ्लाय आणि 100 मीटर बॅकस्ट्रोक या प्रकारांत ऑलिम्पिकच्या ब निकषांची पूर्तता केली आहे. त्यांनी अ निकष गाठले असते, तर ते ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले असते.