मुंबई – अभिनेता कमाल आर खान उर्फ केआरके सिनेसृष्टीत आपल्या सुमार अभिनयासाठी ओळखला जातो. केआरकेचा एकही सिनेमा सिल्व्हर स्क्रीनवर कोणतीच ‘कमाल’ दाखवू शकलेला नाहीये. मात्र हाच केआरके इतरांच्या चित्रपटांचे शिवराळ भाषेत समीक्षण करताना दिसतो. यासाठी नेटकरी त्याला ट्रोलही करतात परंतु केआरकेला त्याचाही काहीही फरक पडत नाही. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठीच तो असे कारनामे करत असावा असा आरोप नेटकरी त्याच्यावर करतात.
दरम्यान, राधे चित्रपटाचे समीक्षण करत केआरकेने थेट सलमान खानशी पंगा घेतला होता. नंतर सलमानने त्याला कायदेशीर नोटीस धाडल्यानंतर केआरके माफीसाठी याचना करताना दिसलेला. परंतु सुधरेल तो केआरके कसला? सलमानसोबत पंगा घेतल्याचे प्रकरण ताजे असतानाच केआरकेने पुन्हा एकदा सलमानला डिवचलं आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, केआरकेने आपल्या ट्विटर खात्यावर एक ट्विट केलं असून यामध्ये त्याने विकी कौशल आणि रणबीर कपूर यांचा फोटो पोस्ट केला आहे. सोबतच त्याने ‘तुम्ही दोघेही निडर आणि शूरवीर आहात. तुम्ही दोघांनीही बरोबरचं केलं. तुम्हा दोघांनाही माझा सलाम!’ असा संदेश लिहला आहे.
केआरकेने हे ट्विट विकी कौशल व कतरिना कैफ यांच्या लव्ह अफेयरबाबतच्या चर्चा सुरु असताना केलं असून त्याच्यामागे सलमान खान याला डिवचण्याचा हेतू असल्याचं दिसतंय.
दरम्यान, सलमान खान व कतरिना कैफ एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहेत. मध्यंतरी रणबीर कपूर व कतरिना यांचेही प्रेमसंबंध जुळल्याच्या चर्चा सुरु होत्या. यावरून सलमान रणबीरवर प्रचंड संतापल्याची वृत्तही आली होती. यानंतर रणबीर व कतरिनाने फारकत घेतली होती. तर आता कतरिनाची नाव विकी कौशल याच्याशी जोडलं जातंय.
हे सर्व सुरु असतानाच केआरकेने सलमान खानला डिवचण्यासाठीच विकी व रणबीर यांचा फोटो ट्विट केलं असल्याची चर्चा मनोरंजन वर्तुळात सुरु आहे. आता दोस्तो का दोस्त दुश्मनो का दुश्मन म्हणून मायानगरीत ओळख असलेला सलमान केआरकेला कसं उत्तर देतो याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.