मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. त्यात येत्या १६ जूनपासून खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करत मुंबईत बाईक रॅली काढणार असल्याचं स्पष्ट केलं.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीवारी करून लोकांना वेड्यात काढलं आहे. मात्र मराठा आरक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी येत्या 27 जून रोजी मुंबईत दहा हजार मोटार सायकलींची रॅली काढण्यात येणार आहे, असं विनायक मेटे यांनी सांगितलं.
न्यायलयाने मराठा आरक्षण रद्द करून एक महिना उलटून गेला आहे. तरी अद्याप फेरविचार याचिका दाखल केली गेली नाही. यापेक्षा निष्क्रियपणा काय असू शकतो, असा सवाल मेटे यांनी उपस्थित केला. न्यायमूर्ती भोसले समितीने सांगितलेलं ऐकायच नाही, याचाच अर्थ सरकारला मराठा आरक्षणाचं काही घेण-देण नाही, असा आरोप मेटे यांनी केला.
दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्दावर आम्ही गप्प बसणार नाही. प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञांच्या बैठका घेतल्या जातील. त्यानंतर जिल्हानिहाय मेळावे घेऊन मोर्चे काढण्यात येतील. मात्र आता काढण्यात येणारे मोर्चे मूक नसून बोलके राहतील. संघर्ष करणारे असतील, असा इशाराही मेटे यांनी दिला. तसेच येत्या 27 जून रोजी मुंबईत दहा हजार मोटारसायकलची रॅली काढण्यात येणार आहे. मराठा समाजात जनजागृती करण्यासाठी ही बाईक रॅली काढण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.