वादावादीनंतर बदनामी होण्याची बोठेला भीती
नगर -यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खून प्रकरणात मुख्य संशयित आरोपी बाळ बोठे याच्यासह अन्य सहा आरोपींविरुध्द आज मंगळवारी पारनेर न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
बोठे व रेखा जरे यांच्यात मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यातून एकमेंकाशी झालेल्या वादावादीनंतर बदनामी होईल, या भीतीपोटी बोठे याने सुपारी देऊन हा खून घडवून आणल्याचा आरोप दोषारोपपत्रात ठेवण्यात आल्याची माहिती तपासी अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांनी पत्रकारांना दिली.
30 नोव्हेंबर 2020 रोजी नगर-पुणे महामार्गावर जातेगाव घाटात रेखा जरे यांचा खून झाला. प्रत्यक्ष हत्या करणारे संशयित आरोपी पकडल्यानंतर बाळ बोठे त्यात मुख्य संशयित सूत्रधार असल्याचे तपासात समोर आले होते. त्यानंतर बेपत्ता झालेल्या बोठेला तीन महिन्यांनी हैदराबाद येथून अटक करण्यात आली होती.
तसेच त्यावेळी त्याला मदत करणाऱ्या सहा जणांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडे झालेल्या तपासानंतर तपासी अधिकारी तथा नगर ग्रामीणचे पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांनी आज मंगळवारी साडेचारशे पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.
बाळ जगन्नाथ बोठे (वय 49 रा. बालिकाश्रम रोड, नगर), जनार्दन अंकुला चंद्रप्पा, राजशेखर अंजय चाकली, पी. अनंतलक्ष्मी व्यंकट सुब्बाचार, इस्माइल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल आरिफ (सर्व रा. हैदराबाद) व महेश वसंतराव तनपुरे (रा. नगर) या सात जणांविरुध्द पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
यापूर्वी प्रत्यक्ष मारेकऱ्यांसह पाच जणांविरुध्द दोषारोपपत्र दाखल आहे. बोठेविरुध्द बारा लाखांची सुपारी देऊन कट रचून जरेची हत्या केल्याचे कलम लावण्यात आली आहेत. इतर सहा जणांविरुध्द फरार असताना बोठेला मदत केल्याप्रकरणी आरोपी करण्यात आले आहेत.
फरार काळातील मदतीच्या गुन्ह्यात अकरा आरोपी अटक असून, त्यातील एक महिला संशयित आरोपी फरार आहे. या दोषारोपपत्रात 26 जणांचे जबाब आहेत. रेखा जरे यांचा मुलगा कुणाल जरे, सिंधूबाई वायकर तसेच महिला व बालकल्याण अधिकारी विजयमाला माने हे खूनाच्या वेळेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत.
रेखा जरे व बोठे हे 2017 मध्ये एकमेंकाशी संपर्कात आले होते. तेव्हापासून त्यांचे प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधानंतर ते एकमेंकांवर संशय घेऊ लागले होते. त्यातून दोघांमध्ये वादावादी होत होती. त्या वादातून होणाऱ्या बदनामीच्या भीतीपोटी बोठे याने जरेच्या हत्येचा कट रचला होता. हत्येच्या दिवशी बोठे सातत्याने जरे यांच्या संपर्कात होता, असे तांत्रिक पुराव्यावरून समोर आले असल्याची माहिती तपासी अधिकाऱ्यांनी दिली. तसा आरोप दोषारोपपत्रात ठेवण्यात आला आहे.
हत्येनंतर सुपारीचे पैसे दिले
हत्या केल्यानंतर त्याच दिवशी अर्ध्या तासांत ठरलेल्या सुपारीचे पैसे आरोपी सागर भिंगारदिवे याला बोठे याने दिले होते. त्यानंतर बोठे हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृतवस्थेत आणलेल्या जरे यांना पाहण्यासाठी आला होता. त्यानंतर प्रत्यक्ष मारेकरी पकडल्यानंतर बोठे हा नगरमधून फरार झाला होता, असेही दोषारोपपत्रात म्हटले आहे.
मोबाइल अहवालाची प्रतीक्षा
या गुन्ह्यात आणखी काही तांत्रिक पुरावे आहेत. मुख्य आरोपी बोठे याच्याकडून हस्तगत करण्यात आलेले मोबाइल तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठविले आहेत. त्या अहवालाची प्रतीक्षा पोलिसांना आहे. हे अहवाल मिळाल्यानंतर ते न्यायालयात सादर केले जातील, अशी माहिती तपासी अधिकारी अजित पाटील यांनी दिली.