नवी दिल्ली – नवीन नियमावलीवरून ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात संघर्षाची ठिणगी पडलेली असतांनाच नवा वाद उभा राहण्याची चिन्हं आहेत. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर हॅण्डलसमोरील ब्लू टिक ट्विटरने हटवली होती त्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ब्लू टिक काढून टाकण्यात आली आहे.
ट्विटरने उपराष्ट्रपतींच्या अकाऊंटची ब्लू टिक काढण्याची चूक सुधारली आहे. आता त्यांच्या अकाऊंटची ब्लू टिक दिसत आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या अनेक ज्येष्ठ आणि मोठ्या नेत्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ब्ल्यू टिक काढून टाकली गेली आहे. यात मोहन भागवत, कृष्णा गोपाळ, सुरेश सोनी, सुरेश जोशी आणि अरुण कुमार यांचा समावेश आहे.
राजीव तुली यांनी ट्विट केले की, ट्विटर इंडियाने आरएसएस नेत्यांच्या हँडलमधून ब्ल्यू टिक हटवली आहे. यासाठी अद्याप कोणतेही कारण देण्यात आले नाही. हे खूप विचित्र आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हेच एकमेव नाहीत. अनेकांच्या अकाऊंटवरुन ब्ल्यू टिक काढून टाकण्यात आलेली आहे. मात्र उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ब्लू टिक पुन्हा सुरू करण्यात आली असली, तरी मोहन भागवत यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ब्लू टिक पुन्हा सक्रीय केलेली नाही.
दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने समाजमाध्यम क्षेत्रात सेवा पुरवणाऱ्या ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअॅप, अशा कंपन्यांसाठी नवी नियमावली जारी केली. तसेच, या नियमावलीमधील तरतुदींचं पालन करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देखील दिली. २६ मे पासून देशात नवी नियमावली लागू करण्यात आली. मात्र, सोशल मीडियावरील एक लोकप्रिय माध्यम असलेल्या ट्विटरनं अजूनही या नियमावलीनुसार अंमलबजावणी केली नसल्यामुळे आता केंद्र सरकारने ट्विटरला शेवटचा इशारा दिला आहे.