नवी दिल्ली – बिहारमधील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या राजदचे खासदार अमरेंद्रधारी सिंह यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. तब्बल 685 कोटी रूपयांच्या खत घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ती कारवाई करण्यात आली.
राज्यसभा सदस्य आणि व्यावसायिक असणाऱ्या 61 वर्षीय सिंह यांना दिल्लीतील घरातून ताब्यात घेण्यात आले. सिंह हे ज्योती ट्रेडिंग कॉर्पोरेशन या दुबईस्थित कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. ती कंपनी संबंधित प्रकरणात सामील आहे. त्या प्रकरणात परदेशी पुरवठादारांनी अवैध कमिशन दिल्याचा आरोप आहे.
त्या व्यवहारांसाठी ऑगस्टावेस्टलॅंड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील आरोपी राजीव सक्सेना याने मदत केल्याचा संशय आहे. संबंधित प्रकरणाचा तपास याआधीच हाती घेणाऱ्या सीबीआयने मागील महिन्यात डझनभर ठिकाणी छापे टाकले.
सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी आता ईडी सरसावली आहे. ईडीने अटक केलेले सिंह हे राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांच्या अटकेवरून बिहारमधील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.