मुंबई : राज्यात गेल्या सहा महिन्यांत आढळलेल्या करोना रुग्णांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता, लहान मुलांमध्ये करोनाचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा बदल आढळून आला नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
करोनाला बळी पडलेल्या 18 वर्षांखालील मुलांचे प्रमाण मे 2021 मध्ये सुमारे 0.07 टक्के इतके आहे, यावरून लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.
नोव्हेंबर 2020 ते एप्रिल 2021 यादरम्यान शून्य ते पाच वर्षे वयोगटात 1.3 टक्के, सहा ते अकरा वर्षे वयोगटात 2.4 टक्के, बारा ते सतरा वर्षे वयोगटात 4.1 टक्के आणि एकूण लहान मुलांमधील बाधितांचे प्रमाण 7.8 टक्के होते.
मार्च 2021 मध्ये शून्य ते पाच वर्षे वयोगटात 1.10 टक्के, सहा ते अकरा वर्षे वयोगटात 2.04 टक्के, बारा ते सतरा वर्षे वयोगटात 3.64 टक्के आणि एकूण लहान मुलांमधील बाधितांचे प्रमाण 6.78 टक्के होते.
एप्रिल 2021 मध्ये शून्य ते पाच वर्षे वयोगटात 1.42 टक्के, सहा ते अकरा वर्षे वयोगटात 2.62 टक्के, बारा ते सतरा वर्षे वयोगटात 4.34 टक्के आणि एकूण बाधित लहान मुलांमधील प्रमाण 8.38 टक्के होते. या आकडेवारीवरून हे स्पष्ट दिसून येते की, करोना संसर्गित बालकांचे प्रमाण गेल्या सहा महिन्यांत जवळपास तेवढेच राहिले आहे.