नवी दिल्ली – देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. आरोग्य यंत्रणाही करोनासमोर हतबल झाल्याचे दिसून येत आहे. तर करोना संसर्गजन्य असल्यामुळे करोना बाधितांना १४ दिवस क्वारंटाईन राहण्याची सक्ती सरकारने केलेली आहे. सध्या खासगी क्षेत्रात देखील करोनाची बाधा झाल्यानंतर कर्मचाऱ्याला पगारी सुट्टी दिली जाते. मात्र पंजाब नॅशनल बँकेत चित्र वेगळंच आहे. येथील बँक व्यवस्थापकाला करोनाची बाधा झालेली असताना ऑक्सिजन सिलेंडरसह बँकेत ड्युटीवर हजर राहावं लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
झारखंडमधील बोकारो येथील हा प्रकार आहे. येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत अऱविंद कुमार हे व्यवस्थापक आहेत. कुमार यांना करोनाची बाधा झाली आहे. त्यांची ऑक्सिजन पातळी खालावल्यामुळे त्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आला आहे. करोनाबाधित असूनही वरिष्ठ त्यांची रजा मंजुर करत नव्हते. त्यामुळे वैतागून कुमार हे ऑक्सिजन सिलेंडरसह बँकेत ड्युटीवर हजर झाले. त्यानंतर बँकेत एकच खळबळ उडाली. अखेर कुमार यांना बँकेने घरी पाठवल.
व्यवस्थापक कुमार यांचा सिंलेडरसह बँकेत ड्युटीवर हजर झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते पत्नीचा आधार घेत ऑक्सिजन सिलेंडरसह बँकेत हजर झाल्याचं दिसत आहे. दुसरीकडे बँकेने म्हटलं की, त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू आहे. ती चौकशी बंद व्हावी यासाठी त्यांनी असा प्रकार केला आहे.
दरम्यान देशात करोनाची दुसरी लाट काही प्रमाणात ओसरल्याचं चित्र आहे. मात्र करोनामुळं होणारे मृत्यू अद्याप कमी झालेले नाही. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.