हृदयद्रावक ! करोनामुळे आठ दिवसात 3 सख्या भावांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील 11 जण बाधित

पाटस – करोनामुळे आठ दिवसात तीन सख्या भावांचा मृत्यू झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना दौंड तालुक्यातील पाटस परीसरात घडली आहे. करोना संसर्गबाधित तीन सख्या भावांचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर येथील आरोग्य विभाग चांगलाच अलर्ट झाला आहे.

पाटस परिसरात गेल्या वीस दिवसात तब्बल 21 जण करोना बाधीत झाले. त्यात एकाच कुटुंबातील अकरा जणांचा समावेश आहे. करोनाबाधित झालेले बहुतांश बरे होऊन घरी परतले मात्र, तीन सख्या भावांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. आठ दिवसात काही दिवसांच्या फरकाने तीनही भावांचा मृत्यू झाला. शुक्रवारी (ता.१९), रविवारी (ता.२१) तर गुरुवारी (ता.२५) या दिवशी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

येथील आरोग्य सेवकाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या गावात एकूण 21 रूग्णांपैकी पाच रूग्णांवर उपचार सुरू आहेत. इतर रुग्ण बरे झाले आहेत. गावातील वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. आरोग्य विभागाच्या वतीने आशा वर्कर्स यांच्या कडून घरोघरी जाऊन कुटुंबातील कोणाला सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आहेत का याची माहिती घेतली जात आहे.

येथील सरपंच यांनी सांगितले की, करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना, व्यापाऱ्यांना मास्क लावणे, गर्दी टाळणे यासंदर्भात आवाहन केले आहे. तरी नागरिकांना काही त्रास होत असल्यास त्यांनी तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. तसेच आठवडे बाजारात गर्दी टाळण्यासाठी योग्य नियोजन केले जात असल्याचेही सरपंचांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.