बंगळुरू – माजी केंद्रीय मंत्री व शेतकरी नेते बाबागौडा पाटील यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.
त्यांनी प्रथम कित्तूरमधून अपक्ष आमदार म्हणून 1989 मध्ये विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर 1998 मध्ये ते भाजपच्या तिकिटावर लोकसभेत निवडून गेले.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते ग्रामविकास राज्यमंत्री होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते एक कार्यक्षम लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांचे आघाडीचे नेते होते, असे येडियुरप्पा यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
पंचायतराज मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली.