रांची – करोनाने माणसाला भरपूर काही शिकवले आहे. सख्खे नातेवाईक देखील किती निर्दयीपणे वागतात याचा अनुभव आता सर्वानाच आला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक पाठ फिरवत असल्याचे अनेक बातम्यांतून समोर आले आहे. अशातच आता झारखंडची राजधानी रांचीमध्ये एकुलत्या एक मुलाने आईचा मृतदेह पाहण्यास आणि अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्याची आई मुलाच्या नात्याला लाजवणारी घटना समोर आलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, रांची शहरातील सांझो देवी यांना अस्वस्थ वाटत असल्याने गांधीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोविड चाचणी केली असता रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र इतर काही कारणाने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह घरी आणण्यात आला. मात्र मुलाने घर आतून लावून घेतले. बाहेर बहिणी टाहो फोडत होत्या. भाऊ आईला कोरोना झाला नव्हता, असे ओरडून सांगत होत्या मात्र कुपुत्राने दरवाजा उघडला नाही. तो बायकोसोबत घरातच बसून राहिला. अखेर बहिणींनी आईवर अंत्यसंस्कार केले.
पतीच्या निधनानंतर आईनेच मुलाला दिली होती नोकरी-
सांझो देवी यांचे पती सीसीएल मध्ये नोकरी करत होते. मात्र 2009 साली त्यांचे निधन झाले. अनुकंपा तत्वानुसार पहिल्यांदा पत्नी सांझो देवी यांना नोकरीसाठी विचारण्यात आले. पण त्यांनी स्वतः नोकरी न करता ती नोकरी मुलाला दिली. त्यानंतर मुलाने आईला त्रास देणे सुरू केले. खर्चासाठी पैसेही देत नसे. त्यामुळे सांझो देवी या मजुरी करून जीवन जगत होत्या, असे त्यांच्या मुलींनी सांगितले.