नवी दिल्ली -आर्थिक परिस्थिती खराब होऊ लागल्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष आता सोने आणि चांदीकडे वळू लागले असल्याचे दिसून येते. या दोन धातूंची मागणी वाढल्यामुळे त्यांच्या किमती वाढत आहेत.
शुक्रवारी दिल्ली सराफात सोन्याचा दर 140 रुपयांनी वाढून 47,110 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर चांदीचा दर 513 रुपयांनी वाढून 70,191 रुपये प्रति किलो झाला.
अक्षय तृतीयेमुळे थोडीफार खरेदी झाल्यामुळे भारतामध्ये सोन्याचे दर वाढले असल्याचे दिसून आले. एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की जागतिक बाजारातील संकेतांनुसार भारतातील सोन्याचे दर वाढले.
जागतिक बाजारात सोन्याचे दर 1,834 डॉलर तर चांदीचे दर 27.20 डॉलर प्रती औंस या पातळीवर गेले. डॉलर कमकुवत होत असल्यामुळे सोन्याला आधार मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.