कोरोनो संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोव्हिड-19 ची लागण होण्याची भीती तज्ज्ञांनी वर्तवली आहे. हा संभाव्य धोका लक्षात घेता मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबादसारख्या महानगरात लहान मुलांसाठी कोव्हिड सेंटर उभारण्याचं काम सुरू झालं आहे. या सेंटरमध्ये ऑक्सिजन, व्हेन्टिलेटर आणि अतिदक्षता विभाग (NICU) असणार आहेत.
कोरोनाग्रस्त लहान मुलांवर उपचार कसे करायचे, याबाबत मार्गदर्शनासाठी सरकारने नऊ बालरोगतज्ज्ञांची टास्कफोर्स तयार केलीय.
आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगतात, लहान मुलांचे बेड्स, वॉर्ड, व्हेन्टिलेटर आणि औषध वेगळी असतात. त्यामुळे टास्सफोर्सच्या सूचनेनुसार निर्णय घेतला जाईल.
टास्कफोर्सने सरकारला केलेल्या सूचना
कोरोनासंसर्गाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण वाढलं आहे. 1 मार्च ते 19 एप्रिल दरम्यान राज्यात 0 ते 20 वयोगटातील दीड लाखांपेक्षा जास्त मुलांना कोरोनासंसर्ग झाला आहे. बालरोगतज्ज्ञांच्या टास्कफोर्सने उपाययोजनांच्या गरजेबाबत सरकारला मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यात बालरोगतज्ज्ञ, औषध, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची गरज हे प्रमुख मुद्दे आहेत. मुंबईतील बालरोगतज्ज्ञ डॉ. सुहास प्रभू या टास्कफोर्सचे प्रमुख आहेत. ते म्हणतात की, सध्या 90 टक्के मुलांना लक्षणं दिसून येत नाहीत किंवा अत्यंत सौम्य आजार होतो. एक-दोन दिवसात ही मुलं घरच्या-घरी बरी होतात.
- फिव्हर क्लिनिक
जिल्हा आणि तालुका स्तरावर फिव्हर क्लिनिक तयार करावे लागतील. याठिकाणी 90 टक्के लहान मुलांवर उपचार शक्य होतील. ज्यांना अत्यंत सौम्य आजार आहे. - रुग्णालयात उपचारांची गरज
उरलेल्या 10 टक्के मुलांना रुग्णालयात ऑक्सिजन, सलाईनची गरज लागेल. यासाठी कोव्हिड केअर सेंटर तयार करावे लागतील. - ICU ची गरज
गंभीर स्वरूपाचा आजार असलेल्यांसाठी ICU लागतील. हे नवीन तयार करणं कठिण आहे. त्यामुळे उपलब्ध सुविधांमध्ये अतिदक्षता कक्ष तयार करावे लागतील. शहरात घरीच उपचार घेणाऱ्या मुलांचं मॉनिटरिंग शक्य आहे. पण, ग्रामीण भागात हे शक्य होणार का? त्यांच्याकडे स्मार्टफोन, पल्स ऑक्सिमीटर असणार का? हा देखील एक प्रमुख मुद्दा आहे. कोव्हिड सेंटरमध्ये मुलं एकटी राहणार नाहीत. त्याच्यासोबत कोणीतरी रहावं लागेल. मग, त्यांचं संरक्षणं कसं करायचं. याबाबत विचार करावा लागेल.
मुंबईत आत्तापर्यंत 40 हजारपेक्षा जास्त लहान मुलांना कोरोनाची लागणी झाली आहे. 0 ते 9 वयोगटातील 11, 423 मुलांना संसर्ग झाला ज्यातील 17 मुलांचा मृत्यू झाला आहे. 10 ते 19 वयोगटातील 29,463 मुलांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 34 मुलं मृत्यूमुखी पडली आहेत. शहरात लहान मुलांचे कोव्हिड केअर वॉर्ड तयार करण्यात येतील. लहान मुलांसाठी 500 बेड्स तयार केले जातील. जंबो कोव्हिड सेंटर्समध्ये वेगळा वॉर्ड असेल. मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात मॅटर्निटी होममध्ये कोव्हिड सेंटर बनवण्याबाबत विचार सुरू आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात तालुका स्तरावर लहान मुलांचा कोव्हिड वॉर्ड तयार करण्याची सूचना केली आहे. तर, पुणे महापालिकेने राजीव गांधी रुग्णालयात लहान मुलांसाठी कोव्हिड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर मुरलीधर मोहोळ सांगतात, लहान मुलांच्या कोव्हिड सेंटरमध्ये 100 ऑक्सिजन बेड्स, 30 कोव्हिडग्रस्त महिलांची प्रसूती करण्यासाठी बेड्स, 12 लहान मुलांचे अतिदक्षता कक्ष, 20 ICU आणि 10 ICU-व्हेन्टिलेटर्स असतील. येत्या महिनाभरात याचं काम पूर्ण केलं जाईल.
पंढरपुरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. शितल शहा यांनी लहान मुलांचा 15 बेड्सचा कोव्हिड वॉर्ड सुरू केलाय. गेल्यावर्षी पॉझिटिव्ह लहान मुलं आढळून आली नाही. आता मात्र, 10 मुलांमागे 4 मुलांना कोरोनासंसर्ग होतोय. त्यामुळे 1 ते 12 वर्षं वयोगटातील मुलांसाठी कोव्हिड वॉर्ड सुरू केला. सद्यस्थितीत डॉ. शहा यांच्याकडे 9 कोरोनाबाधित मुलं उपचार घेत आहेत. यातील सहा बेड्स ऑक्सिजनची सुविधा असलेले आहेत. कोरोनासंसर्गाच्या दुसऱ्या लाटेत आत्तापर्यंत 25 लहान मुलांवर उपचार केले आहेत. या मुलांना न्यूमोनियाचा त्रास आहे. सौम्य आजार असलेल्या मुलांवर घरीच उपचार करतो.