नवी दिल्ली -जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर आज कमी झाले. त्या प्रमाणात भारतीय सराफात सोने आणि चांदीच्या दरात घट नोंदली गेली.दिल्ली सराफात मंगळवारी सोन्याचा दर 212 रुपयानी कमी होऊन 47,308 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 973 रुपयांनी कमी होऊन 70,646 रुपये प्रति किलो झाला. जागतीक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,834 डॉलर तर चांदीचा दर 27.34 डॉलर प्रति औंस झाला.
याबाबत एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, डॉलर कमकुवत होत आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या रोख्यांवरील परतावा वाढत असल्यामुळे सोन्याचे दर वाढत असल्याचे चित्र जागतिक बाजारात निर्माण झाले आहे. सध्याच्या पातळीवर सोन्याचे दर काही प्रमाणात स्थिर राहण्याची शक्यता असल्याचे बऱ्याच विश्लेषकांनी सूचित केले.