पुणे : कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे आणि दि पूना मर्चंट चेंबरच्या सहकार्याने महापालिकेच्या वतीने सोमवारपासून (दि.10) करोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथे हे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्रात साधारणः दररोज 200 ते 300 इतक्या लस उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे बाजार घटकांना आता लस मिळणार आहे.
पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या हस्ते लसीकरण केंद्र, तापाचा दवाखाना (फिवर ओ पी डी) आणि रॅपिड एंटीजन टेस्टचे उदघाटन करण्यात आले. त्यावेळी बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड, जेष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, उपसचिव सतीश कोंडे, दि पुना मर्चंटस चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, उपाध्यक्ष अशोक लोढा, सहसचिव विजय मुथा, नगरसेवक प्रवीण चोरबेले, राजेंद्र बाठीया, अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, उपाध्यक्ष अमोल घुले, फळ विभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे, तरकारी विभाग प्रमुख दत्तात्रय कळमकर, आप्पा गायकवाड, कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे, अध्यक्ष किसन काळे, राजेंद्र चोरगे, हनुमंत बहिरट आदी यावेळी उपस्थित होते