नंदूरबार – राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी लाॅकडाऊन लागू करण्यात आले आहे. संचारबंदी, जमावबंदी लागू आहे. अशातच रमझानचा महिना असल्याने नमाज पठणासाठी मुस्लिम बांधव मशिदीत जात आहेत. जास्त लोक एकत्र आले तर करोनाचा संसर्ग पसरू शकतो. हा धोका लक्षात घेऊन मशिदीत गर्दी करू नका, म्हणत नमाज पठण करण्यापासून रोखल्याने दोन मुस्लिम गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना 8 मे रोजी रात्री नंदुरबार शहरातील चिराग अली मशिदीसमोर घडली आहे.
लोखंडी राॅड, लाकडी दांडके, आणि हाॅकी स्टिकने एकमेकांवर हल्ला करत दोन्हा गटांनी एकमेकांची डोकी फोडली आहेत. या हाणामारीत सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याप्रकरणी दोन्ही गटांनी नंदूरबार शहर पोलिसात एकमेकांविरूद्ध फिर्यात दाखल केली असून 12 जणांना अटक केली आहे, अन्य 9 जणांचा शोध सुरु आहे.
सविस्तर माहिती अशी की, 8 मे रोजी रात्री शहरातील मुस्लिम बांधव मशिदीसमोर नमाज पठणासाठी जमले होते. यावेळी मशिदीसमोर गर्दी करू नका, आतमध्ये एकावेळी केवळ पाच जणांनाच प्रवेश आहे, असे सांगण्यात आले. त्यानंतर नमाज पठणापासून रोखल्यामुळे एक जमाव दुसऱ्या जमावावर धावून गेला. त्यानंतर दोन्ही गटात बाचाबाची झाली आणि त्याचे रुपांतर तुंबळ हाणामारीत झाले. याप्रकरणी अधिक तपास नंदूरबार पोलीस करत आहेत.