सातारा – इनडीआरएफच्या सहकार्यातून जिल्ह्यात 17 ठिकाणी ऑक्सिजन प्लँट होणार आहेत.पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन प्लँट उभारण्यात येणार असून लवकरच या कामाची सुरुवात होणार आहे.
या प्लँटमुळे ऑक्सिजनच्या टंचाईवर मात करणे शक्य होणार आहे,अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी दिली. दरम्यान वाठार स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्राला लवकरच सुसज्ज रुग्णवाहिका मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक ठिकाणी बेड,ऑक्सिजन उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. उत्तर कोरेगाव भागातही बहुतांश गावांमध्ये बाधित आढळून आले आहेत. काही बाधितांचा मृत्यू झाला आहे.
दिवसेंदिवस गंभीर परिस्थिती निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत उत्तर कोरेगाव मधील प्रत्येक गावात जाऊन त्यांना आधार देण्याचे काम केले असल्याची मंगेश धुमाळ यांनी सांगितले.
एनडीआरएफच्या सहकार्यातून सातारा जिल्ह्यात सतरा ठिकाणी ऑक्सीजन प्लँट उभे राहणार आहेत. उत्तर कोरेगावमध्येही अशा प्लँटची गरज असून त्यासाठी पाठपुरावा केल्याने पिंपोडे बुद्रुक ग्रामीण रुग्णालयात हा प्लँट होणार आहे. लवकरच प्लँट उभारणीस सुरुवात होणार आहे. त्यामुळे दररोज साठ सिलेंडर ऑक्सिजन या प्लँटच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. या प्लँटच्या उभारणीमुळे ऑक्सिजनची टंचाई कमी होण्यास मदत होणार असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.
वाठार स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत मोठ्या प्रमाणात गावे येत आहेत. प्रत्येक गावात आरोग्याच्या सुविधा पोहोचवण्यात रुग्णवाहिके अभावी अडचणी येत होत्या. या ठिकाणी सुसज्ज रुग्णवाहिका असावी, अशी मागणी होती. याबाबत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाठपुरावा केला असून लवकरच या आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे. पिंपोडे बुद्रुक ग्रामीण रुग्णालयास पण सुसज्ज रुग्णवाहिका मिळावी, अशी मागणी केली असल्याची माहिती मंगेश धुमाळ यांनी दिली.
दिवसेंदिवस करोनाचे संकट गडद होत असताना एनडीआरएफच्या सहकार्यातून पिंपोडे बुद्रुक ग्रामीण रुग्णालयात होत असलेल्या ऑक्सीजन प्लँटमुळे नागरिकांमधील भीती कमी होण्यास मदत होणार आहे. लवकरच हा प्लँट कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
-मंगेश धुमाळ
(कृषी सभापती जिल्हा परिषद सातारा)