– राजेंद्र भोसले
ज्येष्ठ कथाकार बबन पोतदार यांनी संपादित केलेला “सर्वस्पर्शी प्रतिभांचा कथाविष्कार’ हा प्रातिनिधिक कथासंग्रह. महाराष्ट्रातील नामवंत वीस कथाकारांच्या दर्जेदार वीस कथा या कथासंग्रहात समाविष्ट आहेत. गोष्ट किंवा कथा ही कोणत्याही वयोगटातील व्यक्तीच्या आवडीचा साहित्यप्रकार.
विविध भागातील, विविध सामाजिक परिस्थितीतील लेखकांच्या वीस कथांनी “सर्वस्पर्शी प्रतिभांचा कथाविष्कार’ हा प्रातिनिधिक कथासंग्रह साकारला आहे. या कथासंग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील सर्व लेखक कसलेले, दिग्गज व लोकप्रिय आहेत. प्रत्येक लेखकाचा सांस्कृतिक परिघ वेगवेगळा आहे. त्यामुळे प्रत्येक कथेत जिवंतपणा व ठसठशीतपणा आलेला आहे. प्रत्येक कथा उच्च मानवी जीवनमूल्यांचा सुंदर आविष्कार करते.
यातील अनेक लेखकांनी आपल्या परिसरातील समस्या, अनुभव, प्रसंग, संवाद मोठ्या खुबीने चित्रित केलेले आहेत. वाचकांना त्या कथा आपल्याच किंवा आपल्या परिसरात घडलेल्या आहेत, असे वाटते. “गाठभेट’ या बबन पोतदार यांच्या कथेत ग्रामीण भागातील वृद्धेच्या अखेरच्या काळाचे वर्णन वाचकांच्या डोळ्यांत अश्रू आणणारे आहे. “सुखाचा सदरा’ ही सुनील वेदपाठक यांची कथा एस.टी. प्रवासात भेटलेल्या सकारात्मक ऊर्जा बाळगणाऱ्या एका अवलिया प्रवाशाची आहे. गुणवंत पाटील यांची “वाटणी’ ही कथा ग्रामीण भागातील वाटणीच्या वेळचे वर्णन करते.
याशिवाय या कथासंग्रहात लक्ष्मीकमल गेडाम, संध्या धर्माधिकारी, राजेंद्र भोसले, मंगला बक्षी, वंदना धर्माधिकारी, अजित काटकर, सुवर्णा मस्कर, प्रशांत सातपुते, पौलस वाघमारे, राजेंद्र अत्रे, डॉ. राजश्री पाटील, हरिश्चंद्र पाटील, शंकर पाटील, दीपक लोंढाळ, प्रकाश महामुनी, बबन कदम, आशा पाटील या कथाकारांच्या दर्जेदार कथा समाविष्ट आहेत. प्रत्येक कथेपूर्वी लेखकाचा वाङ्मयीन परिचय थोडक्यात फोटोसह देण्यात आला आहे. बबन पोतदार यांनी मनोगतात या कथा संग्रहामागची भूमिका विस्तृतपणे व्यक्त केली आहे.
89व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना म्हणजे या कथासंग्रहाचा अलंकार आहे. हा कथासंग्रह कथाविश्वातील एक मैलाचा दगड आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. समर्पक असे मुखपृष्ठ श्रीकृष्ण ढोरे यांनी साकारले आहे. अंतरंगाने व बाह्यांगाने हा कथासंग्रह उत्कृष्ट झालेला असून रसिक वाचक “सर्वस्पर्शी प्रतिभांचा कथाविष्कार’चे स्वागत करतील. वेदान्तश्री प्रकाशन, पुणे पृष्ठ संख्या-280. मूल्य- रु.200/-