मुंबई, दि. 7- एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची तडकाफडकी एटीएसमधून उचलबांगडी झाली. त्यांची गोंदिया येथे बदली झाली. याआधी दया नायक एटीएसमध्ये पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. आता दया नायक गोंदिया जिल्हा जात प्रमाणपत्र समितीचे उपसंचालक म्हणून काम करतील. नेहमीची बदली (रुटिन ट्रान्सफर) असल्याचे सांगितले जात असले तरी या बदलीमुळे पोलीस वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
नायक यांनी नव्वदीच्या दशकात 83 गुंडांचा एन्काउंटर करून स्वतःचा दबदबा निर्माण केला होता. पण बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात निलंबन झाल्यामुळे दीर्घकाळ दया नायक मुंबईच्या पोलीस दलाबाहेर होते. या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर काही काळाने दया नायक पुन्हा मुंबई पोलीस दलात दाखल झाले. त्यांची 2019 मध्ये मुंबईतील आंबोली पोलीस ठाणे येथून एटीएसमध्ये पोलीस निरीक्षक पदावर बदली झाली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मातोश्री बंगल्यावर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईच्या निवासस्थानी तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्यांच्या अधिकृत सरकारी निवासस्थानी असताना फोन करून धमकी दिल्याचे प्रकरण चर्चेत आले. या प्रकरणाचा तपास दया नायक यांच्याकडे सोपवण्यात आला होता. दया नायक यांनी या प्रकरणात कोलकाता येथून पलाश बोस नावाच्या व्यक्तीला अटक केली होती.