पुणे – करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन पुणे महापालिकेने उपचाराच्या दृष्टीने उपाययोजना वाढविण्याच्या निरंतर प्रयत्न सुरू ठेवला आहे. पुढील लाटेत अल्पवयीन मुलांमध्ये करोना संसर्ग वाढू शकतो ही शक्यता गृहीत धरून येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात मुलांसाठी स्वतंत्र 50 बेडचे कोविड हॉस्पिटल निर्माण करण्यात येणार आहे. तसेच बालरोग तज्ज्ञांचीही येथे नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.
करोनाच्या पहिल्या लाटेचा सर्वाधिक फटका प्रतिकारशक्ती कमी असलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि सव्याधीग्रस्त घटकाला बसला. तर सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या लाटेमध्ये तरुणवर्ग सापडला आहे. दुसऱ्या लाटेच्या संसर्गाचा अंदाज न आल्याने पुणेच नव्हे तर संपूर्ण देशभरात सर्वच आरोग्य व्यवस्था कोलमडून पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बेड, ऑक्सिजन बेडस्, व्हेंटिलेटर बेडपासून ते रेमडेसिविर आणि अन्य औषधांचा तुटवडा भासत आहे. त्यातून तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामध्ये लहान मुले बाधित होऊ शकतील, असे भाकीत केले आहे.
लहान बालकांपासून 10 वर्षे वयाच्या मुलांच्या घशात असलेल्या थायमस ग्रंथीमुळे बऱ्यापैकी प्रतिकारशक्ती असते. परंतु, 18 वर्षांखालील प्रामुख्याने 10 ते 18 वर्षे वयोगटातील युवकांमध्ये करोनाशी लढा देणारी प्रतिकारशक्ती वाढवण्यासंदर्भात अद्याप लस किंवा औषध नाही. त्यामुळे या गटातील मुलांना संसर्ग होऊन गंभीर समस्या उद्भवल्यास तिसऱ्या लाटेला लहान मुले बळी पडू शकतात.
येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयामध्ये लहान मुलांवरील उपचारासाठी खास स्वतंत्र 50 बेडचे हॉस्पिटल राखीव असेल. मुलांचे पालकही बाधित असतील, तर त्यांच्यावरही याच ठिकाणी उपचारासाची सुविधा करण्याचा आमचा प्रयत्न राहील. महापालिकेकडे सध्या 9 बालरोग तज्ज्ञ आहेत. तसेच आणखी 9 नेमण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
– रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त पुणे महापालिका