बंगळुरू – बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचे वडील आणि माजी बॅडमिंटन चॅम्पियन प्रकाश पदुकोण यांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. प्रकाश पदुकोण यांच्यावर बंगळुरूमधील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दीपिकाची आई आणि बहीणही करोनाग्रस्त आहेत. पण त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.
काही दिवसांपूर्वीच प्रकाश पदुकोण यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर बंगळुरूच्या महावीर जैन रुग्णालयात त्यांना शनिवारी दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती सुधारत असून लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती संबंधित डॉक्टरांनी दिली आहे. प्रकाश पदुकोण यांनी त्यांच्या बॅडमिंटन कारकिर्दीत प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद मिळवले होते. जागतिक क्रमवारीत ते अग्रस्थानीही होते.
66 वर्षांचे प्रकाश पदुकोण यांनी 1980च्या दशकात भारताचे नाव बॅडमिंटन क्षेत्रात नावारूपाला आणले होते. कॉमनवेल्थ गेम्समध्येही त्यांनी भारतासाठी पदक जिंकले होते.
प्रकाश पदुकोण यांची पत्नी उज्ज्वला आणि दुसरी मुलगी अनिषा या दोघींनाही करोनाची लागण झाली आहे. त्या घरी उपचार घेत आहेत. प्रकाश पदुकोण यांनी करोनाची लस घेतली होती. त्यांचा दुसरा डोस बाकी होता. त्यापूर्वीच त्यांना या विषाणूची लागण झाली.