– अमित डोंगरे
आयपीएल स्पर्धेत आरसीबी संघाकडून खेळत असलेला हर्षल पटेल याच्या एका निर्णयाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे. गलेलठ्ठ पगाराची नोकरी आणि स्वप्नवत आयुष्य घालवण्यासाठी अमेरिकेत कायमस्वरूपी स्थायिक होण्याची आलेली संधी त्याने सोडली. केवळ क्रिकेटवरील प्रेमापोटी व याच खेळात कारकीर्द घडवण्याची त्याची जिद्द अखेर यशस्वी ठरली.
सुरुवातीला त्याच्या कुटुंबीयांनी अमेरिकेतच राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हर्षलने क्रिकेटसाठी हा निर्णय न घेता भारतातच थांबण्याचा निर्णय घेतला व जिद्दीच्या जोरावर तो यशस्वीही केला.
यंदाच्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा दोन गडी राखून पराभव केला. विराट कोहलीच्या संघाच्या या विजयात अष्टपैलू हर्षल पटेलची कामगिरी निर्णायक ठरली. त्याने या सामन्यात 27 धावांत 5 गडी बाद करत सामना फिरवला. स्पर्धेच्या इतिहासात मुंबई विरुद्धच्या सामन्यात 5 बळी घेणारा हर्षल पहिलाच गोलंदाज ठरला.
या कामगिरीमुळे हर्षल एका रात्रीत स्टार बनला. 2005 मध्ये हर्षलकडे कुटुंबातील सदस्यांसोबत अमेरिकेत स्थायिक होण्याचा पर्याय होता. परंतु क्रिकेटसाठी त्याने भारतातच थांबण्याचा निर्णय घेतला.
हर्षलला ज्युनियर क्रिकेटचा स्टार खेळाडू मानले जात होते. 2008-09 साली 19 वर्षांखालील विनू मांकड स्पर्धेत त्याने 23 बळी घेतले. 2010 साली 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत हर्षलची भारतीय संघात निवड झाली होती; परंतु एकही सामना खेळण्याची संधी त्याला मिळाली नाही.
वरिष्ठ स्पर्धेत गुजरात संघात निवड न झाल्यामुळे हर्षल हरियाणाला रवाना झाला. 2011-12 रणजी मोसमात हर्षलने उपांत्यपूर्व व उपांत्य सामन्यात सरस कामगिरी करत निवड समितीलाही आपली दखल घ्यायला भाग पाडले. त्या मोसमात त्याने गोलंदाजीसह फलंदाजीतही चमक दाखवली.
अमेरिकेला न जाण्याच्या हर्षलच्या निर्णयावर कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, त्याचा भाऊ तपन पटेल यांनी समर्थन केले. हर्षल अमेरिकेचा ग्रीनकार्ड होल्डर असून 2008 साली अमेरिकेत न्यू जर्सी क्रिकेट लीगमध्येही खेळला आहे. आज हर्षल कोहलीच्या संघाचा आश्वासक खेळाडू बनला असून येत्या काळात त्याला भारतीय संघाकडून खेळताना पाहण्यासही उत्सुकता वाढली आहे.