पुणे – करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. संपूर्ण कुटुंबच्या कुटुंबबाधित होण्याच्या तसेच यातून विलगीकरणात राहण्याची वेळ येत आहे, अशा रुग्णांना जेवण कोण देणार? स्वयंपाक कोण करणार? असे प्रश्न उपस्थित होत असतानाच सामाजिक जाणिवेतून एक व्यक्ती अशा लोकांसाठी झटत आहे, त्यांच्या कार्यातून अनेकांच्या जेवणाची चिंता मिटली आहे…, त्यांचे नाव आहे राजेंद्र शहा.
करोनाचा कहर गेल्या वर्षीपासून सुरू झालेला असताना यातून रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाइकांसमोर जेवणाची अडचण समोर उभी राहत असे, सर्वच रुग्णालयात जेवण उपलब्ध होत नसल्याने अशा बाधित रुग्णांसाठी तसेच त्यांच्या नातवाइकांना सात दिवस जेवणाचा डबा पोहोचविण्याचा उपक्रम श्री पुना मोढ मित्र मंडळाच्या माध्यमातून अध्यक्ष राजेंद्र शहा हे करीत आहेत.
दि. 26 ऑगस्ट 2020 पासून सदर उपक्रम यशस्वीरित्या सुरू असून, आजपर्यंत अनेकांना याचा लाभ झाला आहे. राजेंद्र शहा आणि मंडळाचे 13 सहकारी रात्रंदिवस हे काम करीत आहेत. आपले सर्वस्व पणाला लावून समाजहितासाठी कार्यरत असलेल्या श्री पुना मोढ मित्र मंडळ तसेच शहा यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
करोना कालावधीत अनेकांचे व्यवसाय बंद आहेत, नोकऱ्या गेल्या आहेत. त्यातच बाधित झाल्यानंतर अशा अडचणीच्या काळात व्यक्ती मानसिकरित्या खचून जाते. या उपक्रमातून त्यांना आधार मिळत आहे.
– राजेंद्र शहा, अध्यक्ष, श्री पुना मोढ मित्र मंडळ