पुणे – करोना आणि लॉकडाउनमुळे सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध लागू आहेत. त्यामुळे प्रवासी संख्या घटल्याने बसेसदेखील रद्द आहेत. जिल्ह्यातील एसटी आगारांतून येणाऱ्या बसदेखील रद्द आहेत. मात्र, यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे.
काही दिवसांपूर्वी मूळगावी परतणाऱ्यांची एसटी स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. मात्र, आता लॉकडाऊन लागल्याने प्रवासी संख्या घटली आहे. स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवाडी), पुणे स्टेशन येथून बसेस धावतात. यामुळे स्थानकेदेखील गर्दीने फुललेली असतात. मात्र, आता स्थानकांमध्ये शुकशुकाट आहे. सध्या प्रवासी संख्या तुरळक असल्याने, किमान 22 प्रवासी असल्यास आणि एखाद्या मार्गावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्यास त्यांना बस उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या तालुक्याच्या ठिकाणांसह प्रमुख स्थानकात प्रवासी संख्या कमी आहे. मुंबईकडे जाणाऱ्या बसेसमध्ये तुलनेने अधिक प्रवासी संख्या आहे. प्रवासी संख्या अधिक असल्यास बस सोडण्यात येत आहे. रविवारी जिल्ह्यात 17 बसेसचे संचलन झाल, असे पुणे विभागाने वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर रणवरे यांनी सांगितले.
सध्या बसेसची संख्या कमी असल्याने आम्हांला ड्युटीदेखील रोटेशन पद्धतीने आहे. मात्र, ड्युटीचे ठोस वेळापत्रक नसल्याने काहीशी द्विधा मनस्थिती असल्याचे वाहक साधू जाधव यांनी सांगितले.