पुणे – शहरासह उपनगरांच्या काही भागांत सोमवारी (दि.26) सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे तापमान कमी होऊन उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.
दक्षिण तमिळनाडू आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रादरम्यान कमी दाबाचा पट्टा आता तामिळनाडू ते बिहार यादरम्यान कार्यरत आहे. त्यामुळे महारराष्ट्रसह दक्षिणेकडील बहुतांशी राज्यांत अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर उत्तर आणि पूर्वेकडील काही राज्यांतही पावसाचे वातावरण आहे.
परिणामी, राज्यातील बहुतांश भागात 25 ते 28 एप्रिलदरम्यान पाऊस पडण्याचा अंदाज आहे. गेल्या दोन दिवसापासून पुण्यात सकाळी उकाडा आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यातच सोमवारी दिवसभर उकाडा जाणवत होता, मात्र दुपारनंतर वातावरण हळूहळू बदलले. जोरदार वारा, ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाने शहरात हजेरी लावली.