केप टाऊन – अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था “नासा’ने मंगळावर उतरवलेल्या अंतराळ यानातील हेलिकॉप्टरने आज तेथून उड्डाण केले. पृथ्वीवरून नियंत्रित केल्या जाणाऱ्या परग्रहावरून उड्डाण करणारे हे पहिले हेलिकॉप्टर ठरले आहे. ही ऐतिहासिक कामगिरी “राईट ब्रदर्स’च्या कामगिरीप्रमाणे असल्याप्रमाणे साजरी केली जात आहे. “इन्जेन्युइटी’ नावाचे 4 पौंड वजनाचे हे हेलिकॉप्टर 1903 सालच्या राईट फ्लायर प्रमाणेच आहे. राईट ब्रदर्सच्या या विमानाने किटी हॉक पासून नॉर्थ कॅरोलिनापर्यंतचे ऐतिहासिक उड्डाण केले होते.
“मानवाने दुसऱ्या ग्रहावर रोटरक्राफ्ट उडवले आहे, असे आता आपण असे म्हणू शकतो.’ असे प्रकल्प व्यवस्थापक मिमी मींग यांनी त्यांच्या चमूला संबोधित करताना जाहीर केले.
इन्जेन्युइटी’ हे हेलिकॉप्टर पर्सीव्हरन्स अंतराळ यानातून मंगळावर पाठवण्यात आले आहे. फेब्रुवारी महिन्यात डेल्टा नावाच्या प्राचीन नदीच्या पात्रात हे यान उतरले होते. 85 दशलक्ष डॉलर्सचे हेलिकॉप्टरचे हे प्रात्यक्षिक करणे म्हणजे खूपच मोठा धोका समजले जात होते. मात्र त्याच बरोबर या प्रयोगाची यशस्विता हे खूप मोठे यशही मानले जात आहे.
प्रत्येक जगाला फक्त एकदाच प्रथम उड्डाण अनुभवण्याची संधी मिळते, असे प्रकल्प व्यवस्थापक मिमी आँग यांनी या महिन्याच्या सुरूवातीला नमूद केले होते. सोमवारी पहाटे नासाच्या वेबकास्टवर बोलताना त्यांनी हे उद्दिष्ट म्हणजे मूलभूत स्वप्न असल्याचे म्हटले होते. आगोदरच प्रोग्राम केलेले हेलिकॉप्टर यशस्वी झाले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आँग आणि त्यांच्या टीमला उत्कंठावर्धक तीनपेक्षा जास्त काळ वाट बघावी लागली होती.
मंगळावर घडत असलेल्या या हेलिकॉप्टरच्या उड्डाणाला तब्बल 178 दशलक्ष मैल (287 दशलक्ष किलोमीटर) दूरून नियंत्रित केले गेले. आठवड्याभरापूर्वी सॉफ्टवेअरमधील चूकीमुळे हेलिकॉप्टरला उड्डाण करण्यात अपयश आले होते. ही चूक सुधारण्यासाठी इंजिनिअरना अपार कष्ट करावे लागले होते. मात्र यशस्वीतेची घोषणा झाल्यावर ऑपरेशन सेंटरमध्ये एकच आनंदोत्सव झाला. या यशस्वी उड्डाणाचा पहिला कृष्णधवल फोटो स्क्रीनवर उमटला तेंव्हा त्याहीपेक्षा अधिक मोठा आनंद व्यक्त झाला. गेल्या जुलैमध्ये पर्सिव्हरन्सने उड्डाण केले होते. तेंव्हापासून या उड्डाणाकडे जगभरातील खगोलप्रेमींचे लक्ष लागून राहिले होते.
कसे झाले पहिले उड्डाण…
हेलिकॉप्टर 3 एप्रिल रोजी रोव्हरवरून मंगळाच्या पृष्ठभागावर सोडण्यात आले. रविवारी कंट्रोलर्सनी रोटर ब्लेड स्पिन-अपसाठी सॉफ्टवेअर सुधारण पाठविल्यानंतर, उड्डाणाचे आदेश पाठविण्यात आले. कॅलिफोर्नियामधील फ्लाइट कंट्रोलर्सने पर्सिव्हरेन्स रोव्हरद्वारे डेटा प्राप्त केल्यानंतर “इन्जेन्युइटी’च्या छोट्याशा उड्डाणाच्या वृत्ताला दुजोरा दिला. “इन्जेन्युइटी’चे हे पहिले उड्डाण 200 फूट म्हणजे अंदाजे 65 मीटर इतक्या अंतराचे होते.
हेलिकॉप्टर बनवण्यासाठी लागली 6 वर्षे
हे हेलिकॉप्टर 40 सेकंदांमध्ये अंदाजे 10 फूट उंच उडणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात हे उड्डाण 30 सेकंदांचेच होते. रोव्हर जवळूनच हे उड्डाण झाले आणि तेथून जवळच उतरले. या हेलिकॉप्टरची पाती मिनिटाला 2500 वेळा फिरणे अपेक्षित होते. पृथ्वीवर ज्यावेगाने ही पाती फिरली असती त्यापेक्षा हा वेग किमान 5 पट अधिक आहे.
मंगळावरील वातावरण पृथ्वीवरील वातावरणाच्या केवळ 1 टक्का आहे. त्याचाच अभ्यास करून इंजिनिअरनी हे हेलिकॉप्टर बनवले आहे. त्याचवेळी मंगळावरील वारे आणि कमालिच्या थंडीतही हे हेलिकॉप्टर कार्यरत रहाणे अपेक्षित होते. चार पाय असलेले “इन्ज्युनिइटी’ तयार करण्यासाठी 6 वर्षे लागली आणि त्याची उंची 1.6 फूट इतकी आहे. उणे 130 फॅरेनहाईट तापमानात याची बॅटरी चार्ज करण्यासाठी हेलिकॉप्टरवर सोलर पॅनेलही बसवलेले आहेत.