दुसऱ्या लाटेमुळे उत्तर प्रदेशातील स्थिती गंभीर; अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून लॉकडाऊनचे आदेश

अलाहाबाद – उत्तर प्रदेशातील पाच शहरांत आठवडाभरासाठी लॉकडाऊन लागू करण्याचा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दिला. त्या शहरांमध्ये लखनौ, वाराणसी, कानपूर, गोरखपूर आणि अलाहाबादचा समावेश आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उत्तर प्रदेशातील स्थिती गंभीर बनली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर त्या राज्यातील विलगीकरण केंद्रांची दुरवस्था आणि करोनाबाधितांवरील उपचारांतील त्रुटींकडे लक्ष वेधणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्या याचिकेची गांभीर्याने दखल घेऊन न्यायालयाने पाच शहरांसाठी तातडीने लॉकडाऊन लागू करण्याचा आदेश दिला. 

लोकांना आठवडाभरासाठी घरांतून बाहेर पडण्यास मनाई केली तर करोना संसर्गाची साखळी तुटू शकेल. त्यामुळे वैद्यकीय आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. उत्तर प्रदेशात रविवारी 30 हजारांहून अधिक नवे करोनाबाधित आढळले. तो त्या राज्यातील एक दिवसाचा आजवरचा उच्चांक ठरला. करोनाबाधित संख्येच्या दैनंदिन वाढीत उत्तर प्रदेश महाराष्ट्रापाठोपाठ देशात दुसऱ्या स्थानावर आहे.

सरकार म्हणते, तूर्त संपूर्ण लॉकडाऊन नाही

न्यायालयाने आदेश दिला असला तरी उत्तर प्रदेश सरकारने तूर्त संपूर्ण लॉकडाऊन करणार नसल्याचे म्हटले आहे. उत्तर प्रदेशचे अतिरिक्‍त मुख्य सचिव नवनीत सेहगल यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. करोना फैलाव रोखण्यासाठी कडक निर्बंध गरजेचे आहेत.

त्यादृष्टीने सरकारने अनेक पाऊले उचलली आहेत. जीव वाचवण्याबरोबरच रोजीरोटीचे संरक्षणही महत्त्वाचे आहे. त्यामुळे सध्या तरी संपूर्ण लॉकडाऊन लागू केला जाणार नाही. लोक स्वत:हून अनेक आस्थापना बंद करत आहेत, असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.