नवी दिल्ली – देशातील रूग्णालयांना वैद्यकीय उपयोगाचा ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी सहकार क्षेत्रातील ईफ्को कंपनीने आता पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीने येत्या पंधरा दिवसांत उत्तरप्रदेश, गुजरात आणि ओडिशा या राज्यांमध्ये तीस कोटी रूपये खर्चुन चार ऑक्सिजन उत्पादन प्लांट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीच्या प्रवक्त्याने पीटीआयला सांगितले की या प्लांटच्या उभारणीसाठी आधीच प्रयत्न सुरू झाले असून आवश्यक ती मशिनरी मिळवण्यासाठी ऑडर्सही देण्यात आल्या आहेत. येत्या पंधरा दिवसांत या प्रकल्पांमधून प्रत्यक्ष ऑक्सिजन उत्पादन सुरू होईल असे त्यांनी सांगितले. गुजरात मधील प्रकल्पातून दर तासाला दोनशे क्युबिक मिटर ऑक्सिजनचे उत्पादन होईल.
हा ऑक्सिजन विविध रूग्णालयाना मोफत पुरवला जाणार आहे. मात्र त्यासाठी संबंधीत रूग्णालयांनी त्यांचे रिकामे सिलिंडर्स येथे घेऊन येणे आवश्यक आहे असे कंपनीने म्हटले आहे. या ऑक्सिजनची साठेबाजी होऊ नये यासाठी संबंधीत रूग्णालयांकडून अनामत रक्कम घेतली जाणार आहे असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.