पिंपरी – भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून उत्थान फाउंडेशन, पिंपरी चिंचवड शहर यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष हरप्रितसिंग यांच्या अध्यक्षतेखाली संकल्प पुष्पमाला समिती, पिंपरी-चिंचवड शहरच्या वतीने दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांसाठी वही, पुस्तके, पेन अशा शालेय उपयोगी वस्तूंचे संकलन करून महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यात वाटप केले जाते. याच अनुषंगाने उत्थान फाउंडेशनतर्फे 50 डझन वह्या व 500 पेनचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संकल्प पुष्पमाला समिती, पिंपरी-चिंचवड शहरचे समन्वयक रमेश जाधव, उत्थान फाउंडेशनचे हरप्रीत सिंग, युवक कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एनएसयूआयचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, उत्थान फाउंडेशनचे कार्यकर्ते जावेद शेख, अतुल आल्हाट, अमोल सूर्यवंशी, मंगेश शेटे, सागर अवसरे, सूरज पांचाळ आदी उपस्थित होते.