- 1606 नागरिकांना लागण
- पाच हजारांहून अधिक अहवाल प्रलंबित
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात करोनाने रोद्र रुप धारण केले आहे. बेड व व्हेंटिलेटर सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने मृतांची संख्या वाढत आहे. बुधवारी मृतांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून तब्बल 45 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1606 नवीन बाधितांची नोंद झाली आहे. तर आज चाचणी केलेल्या 5 हजाराहून अधिक संशयित रुग्णांचे तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
शहरातील करोना परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. वैद्यकीय यंत्रणा तोकड्या पडत असल्याने रुग्णांना प्राण गमवावे लागत आहे. पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, बुधवारी (दि. 14) शहरात 1606 जणांना करोनाची लागण झाली. तर तब्बल 45 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 26 तर शहराबाहेरील 19 जणांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 6136 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 16,306 झाली आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 22,442 इतकी आहे. तसेच आज दिवसभरात 5079 जणांना लस देण्यात आली. आतापर्यंत 2 लाख 10 हजार 400 जणांना लस देण्यात आली आहे.
बाधितांच्या दुप्पट रुग्ण झाले बरे
आज दिवसभरामध्ये दैनंदिन बाधितांच्या तुलनेत दुप्पट रुग्ण बरे झाली असल्याची नोंद करण्यात आली आहे. आज दिवसभरामध्ये 3352 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 48 हजार 628 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 9753 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 5189 रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
जिल्हा रुग्णालयात 33 करोनाबाधित
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात बुधवारी (दि. 14) 33 करोनाबाधित रुग्ण आढळले. दोन रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
करोनाबाधित रुग्ण हे गोखलेनगर, पुणे, थेरगाव, औंध, सांगवी, वडगाव शेरी, चाकण, बालेवाडी, खडकी, पिंपळे गुरव, बोपोडी, औंध, वाकड, हिंजवडी, औंध आदी परिसरातील आहेत. करोनामुक्त झालेले 2 रुग्ण हे निगडी आणि कोंढवा या परिसरातील आहेत. त्यामध्ये एक महिला व एक पुरुष रुग्णाचा समावेश आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान 2 पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला. लोणी काळभोर आणि पिंपळे गुरव येथील हे रुग्ण आहेत. पुणे शहर परिसरातील दोन करोना संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात सध्या 87 जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील 57 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयातून आत्तापर्यंत एकूण 1 हजार 57 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 1 हजार 505 रुग्णांना होम क्वॉरंटाइन केले आहे.