महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचा आदेश
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी करोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही. त्यांनी त्वरित लस घ्यावी. लस घेतल्याबाबतचे लेखी स्वरुपात आपल्या विभागात किंवा कार्यालयात कळविण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.
महापालिकेच्या आस्थापनेवर गट अ ते ड संवर्गात (शिक्षक कर्मचाऱ्यांसह) एकूण 7 हजार 479 अधिकारी, कर्मचारी काम करतात. करोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका स्तरावर विविध उपाययोजना युद्ध पातळीवर राबविण्या येत आहेत. महापालिका अधिकारी, कर्मचारी यांचे आरोग्य निरोगी रहावे. करोना आजारापासून संरक्षण मिळावे.
महापालिका कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. जास्तीत-जास्त नागरिकांना आणि महापालिका आस्थापनेवरील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी लसीकरण करुन घेण्याबाबत यापूर्वीच वेळोवेळी अवगत करण्यात आले आहे. तरी, देखील अद्यापर्यंत बहुतांशी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लस घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे.
पालिका आस्थापनेवरील ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अद्यापपर्यंत करोना प्रतिबंधात्मक लस घेतलेली नाही. त्यांनी त्वरित नजीकच्या लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घ्यावी. लस घेतल्याबाबत लेखी स्वरुपात आपल्या विभागात कळवावे असे आदेश आयुक्त पाटील यांनी दिले आहेत.