नागपूर – राज्यात सध्या करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा देखील अपुऱ्या पडत असून रुग्णांना बेड मिळणं कठीण झालं आहे. दररोज राज्यात ५० हजारहून अधिक नवे रुग्ण आढळत असून सर्वच ठिकाणी करोना पसरला आहे. त्यात आता राज्यातील विविध कारागृहात देखील करोना संसर्ग पसरला असून नागपुरात ७ कैद्यांसह एका तुरुंगरक्षकाला करोनाची लागण झाली आहे.
नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात आजच्या घडीला २२०० वर कैदी आहेत. जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत यातील कैद्यांपैकी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीसह २२ जणांना कोरोणाची बाधा झाली होती. त्यानंतर कारगृह करोनामुक्त झाले होते. मात्र या कारागृहातील कैद्यांमध्ये आता पुन्हा करोनाचे लक्षणे दिसून येत आहेत. शनिवारीपासून आठ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर एका तुरुंग रक्षकालाही करोनाची बाधा झाली आहे.
याआधी एका कैद्याला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर सात जणांची तपासणी करण्यात आली. हे सर्व पॉझिटीव्ह आले. तर एक तुरुंगरक्षकही करोना पॉझिटीव्ह आला असून त्याला गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे.