राज्य शासनाकडून कठोर निर्णयाची अपेक्षा; रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ कशी थांबविणार
– हर्षद कटारिया
पुणे – करोना संसर्ग झालेल्या गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांना “रेमडेसिवीर’ इंजेक्शन परिणामकारक ठरत असून जीवदायी ठरणाऱ्या या इंजेक्शनचा पुण्यात मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे.
आपल्या घरातील व्यक्ती, नातेवाईक, मित्राची आरोग्य स्थिती गंभीर असताना अशा रुग्णांसाठी डॉक्टरांच्या मागणीनुसार “रेमडेसिवीर’साठी जवळच्या नातेवाइकांची मोठी धावपळ होत असून या इंजेक्शनसाठी प्राण कंठाशी येत आहेत. गेल्या एक-दोन दिवसात तर शहरात “रेमडेसिविर’चा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून यात होणाऱ्या काळाबाजाराची दखल राज्य शासनाला घ्यावी लागली आहे. यातून असा काळाबाजार रोखण्याकरिता स्वतंत्र समितीही स्थापन करण्याच्या सूचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केल्या आहेत.
शहरात घडलेल्या घटनांबाबत माहिती अशी की, शुक्रवार पेठेतील केमिस्ट असोसिएशनच्या ऑफिसमध्ये करोना रुग्णांना उपयुक्त ठरणारे “रेमडेसिवीर’ इंजेक्शन मिळेल म्हणून वर्तमानपत्र आणि सोशल मीडियावरील माहितीवरून शेकडो रुग्णांचे नातेवाईक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. मात्र, साठा कमी असल्याने विना अन्नपाणी तासन्तास रांगेत ताटकळत उभा राहणाऱ्यसा नातेवाइकांच्या पदरी निराशाच पडत आहे.
शुक्रवार पेठेतील केमिस्ट असोसिएशनच्या ऑफिसमध्ये कसलेही बिल न देता शासकीय नियमांची पूर्तता करून कागदपत्र घेऊन 4800 रुपये किमतीची लस 2000 रुपयांना देण्यात येत होती. अनेक जणांना आधार कार्ड, डॉक्टरांचे मूळ प्रिस्क्रिप्शन, रुग्ण पॉझिटिव्ह रिपोर्टची झेरॉक्स नसल्यामुळे औषधे दिली गेली नाहीत. झेरॉक्स काढण्यासाठी दुकाने शोधण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक रडकुंडीला आल्याचे चित्र होते अनेक तास रांगेत थांबून फक्त झेरॉक्स नाही म्हणून इंजेक्शन मिळाले नसल्याचे अनेकांनी सांगितले.
घटना क्रमांक 1
अवनी शहा (रा. आदर्श नगर) या महिलेचे पती के.ई.म दवाखान्यात उपचार घेत असून डॉक्टरांनी तातडीने “रेमडेसिवीर’ इंजेक्शन आणण्यास सांगितले. त्या सकाळीच लवकरच शुक्रवार पेठेतील केमिस्ट असोसिएशन ऑफिस बाहेर रांगेत थांबल्या. संध्याकाळी सहा वाजता त्यांचा नंबर आल्यावर रुग्ण करोना पॉझिटिव्ह असलेल्या रिपोर्टची झेरॉक्स मागण्यात आली. परंतु, ती नसल्याने त्यांना इंजेक्शन नाकारण्यात आले. मोबाइलमधील रिपोर्टची प्रिंट काढण्यासाठी दुकाने बंद असल्याने अवनी शहा यांनी तेथेच अश्रूंचा बांध फोडला.
घटना क्रमांक 2
अमिद शेख हा एसी रिपेअरचा व्यवसाय करणारा मुलगा नातेवाइकासाठी इंजेक्शन घेण्यासाठी सकाळपासून रांगेत होता. नंबर आल्यावर इंजेक्शनची किंमत 2000 रुपये पण त्याच्याकडे 1600 रुपये होते, ऍडजेस्ट करतो असे सांगेपर्यंत त्यालाही “रेमडेसिवीर’ देणे नाकारण्यात आले. “गुगल पे’ पासून सर्व पर्यायबाबत पैसे स्वीकारण्यासाठी त्याने टाहो फोडला. नंतर शेजारील एका व्यक्तीने पुढाकार घेत त्याला 500 रुपये उसने दिले.
मेडिकल मालकांची बाजूही ऐका….
इंजेक्शनचा काळाबाजार होत असला तरी पौड रोड तसेच अन्य ठिकाणचे काही प्रामाणिक मेडिकलवाले डॉक्युमेंट व्हॉट्सऍपवर घेणे. 1000 ते 1200 रुपये एमआरपी पेक्षाही कमी किंमतीत इंजेक्शन विकत देत आहेत. त्या दुकानदारांच्या कामाची स्तुती करणे गरजेचे आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या मेडिकल मालकांना सुद्धा प्रशासनाच्या अटीची पूर्तता करण्यात मोठ्या प्रमाणात वेळ जातो. परंतु, ही कागदपत्रे जमा करताना जाणारा वेळ आणि रोजची वाढणारी रुग्णांची संख्या यामुळे होणारी गर्दी हाताबाहेर जात आहे. “रेमडेसिवीर’ची इंजेक्शन विक्रीसाठी किरकोळ मेडिकल विक्रेत्यांनाही परवानगी द्यावी, अशी मागणी पुढे येत आहे.
इंजेक्शन कधी वापरावे…
राज्यशासनाने दिलेल्या प्रोटोकॉलनुसार रुग्णाची ऑक्सिजन पातळी 93 पेक्षा कमी आणि सिटी स्कोर 9 पेक्षा जास्त असेल तरच रेमडेसिवीर इंजेक्शन वापरावे. हायपोरझिया, फिवर आणि सिटी स्कोर याचे प्रमाण पाहूनच गरज असेल तरच या इंजेक्शनचा वापर करणे योग्य ठरते, असे करोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर कन्हैया ताथेड यांनी सांगितले.
काल 18 हजार इंजेक्शन आले होते, त्याचे वाटप करण्यात आले आहे. “रेमडेसिवीर’ इंजेक्शनची किंमत हजार ते 1200 रुपयांपासून सुरुवात आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये इंजेक्शनचा तुटवडा असून गरज नसताना अनेक डॉक्टर इंजेक्शनची मागणी करत आहेत. ते थांबले पाहिजे गंभीर किंवा अति गंभीर रुग्णांसाठीच या इंजेक्शनचा वापर झाला पाहिजे. लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये इंजेक्शन विक्रीसाठी कागदपत्रे, झेरॉक्स नसेल तर रेकॉर्डसाठी गरजेनुसार रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्ट व्हॉट्सऍपवरही कागदपत्रे स्वीकारली जावीत, असे आवाहन मी “प्रभात’द्वारे औषध विक्रेत्यांना करतो आहे.
– एस.बी.पाटील, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन