नवी दिल्ली : देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढतच चालली आहे. त्यातच अनेक राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, दिल्ली सरकारच्या पुढच्या सूचना येईपर्यंत राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा बंद राहतील असा आदेश दिल्ली सरकारने काढला आहे.
दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे, त्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितले की, दिल्लीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, सर्व खासगी क्लासेस हे दिल्ली सरकारच्या पुढच्या सूचना येईपर्यंत बंद राहतील.
दिल्लीमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या जलद गतीने वाढत आहे. शुक्रवारी सकाळची आकडेवारी लक्षात घेता दिल्लीमध्ये एकाच दिवसात 7437 कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे तर 24 जणांचा मृत्यू झाला आहे. त्या आधीच्या दिवशी 5506 रुग्णाची भर पडली होती. आतापर्यंत दिल्लीमध्ये 6,98,008 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 11,157 रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
देशातील अनेक राज्यांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे त्या-त्या राज्य सरकारांनी काही कडक पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. या आधी उत्तर प्रदेश सरकारनेही अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. काही राज्यात मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे तर काही राज्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. महाराष्ट्रातही वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला असून अनेक नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.