पुणे – विकेंड (शनिवार-रविवार) लॉकडाऊनसाठी पोलिसांनी कडक निर्बंध घातले आहेत. विकेंड लॉकडाऊनचे नियम नागरिकांनी पाळावेत तसेच पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन सह आयुक्त रविंद्र शिसवे यांनी केले आहे.
हे निर्बंध शुक्रवारी सायंकाळपासून लागू झाल्याने पोलिसांनी त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. महापालिकेने निर्बंधातून वगळलेल्या अत्यावश्यक सेवा व इतर सेवातील कर्मचाऱ्यांना बाहेर पडताना ओळखपत्र व योग्य ती कागदपत्रे जवळ बाळगणे आवश्यक आहे. पोलिस कागदपत्रे व ओळखपत्र जवळ बाळगणाऱ्यांना योग्य ते सहकार्य करतील. मात्र विनाकारण फिरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
शहरात 96 ठिकाणी नाकाबंदी असणार आहे. पोलिसांचे कर्तव्य आहे की, बाहेर फिरणाऱ्यांना त्याचे कारण विचारणे. यामुळे पोलिसांना योग्य ती माहिती व कागदपत्रे दाखवावीत. पोलिसांनी विचारणा केल्यावर किंवा अडवल्यावर ते वैयक्तीक न घेता सहकार्य करावे. महापालिकेच्या आदेशाने नागरिकांनी पालन करावे. वाढती करोना संख्या लक्षात घेता नागरिकांचे सहकार्य महत्वाचे आहे.
पुणे शहरात करोनाने 12 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो पोलीस अधिकारी व कर्मचारी पॉझिटीव्ह झाले आहेत. आता पोलीस पुन्हा एकदा रस्त्यावर उतरुण कर्तव्य बजावत आहेत. मागील लॉकडाऊनच्या काळात पोलिसांना सामाजिक भान पाळत हजारो नागरिकांना मदत केली होती. तशीच मदत पोलीस सध्याही करतील, मात्र नागरिकांनी लॉक डाऊनच्या नियमांचे पालण करणे आवश्यक आहे.