नवी दिल्ली- देशात लसटंचाईची ओरड सुरू असताना केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यात भारतात एकाच दिवशी तब्बल 43 लाख लोकांना लस देण्यात आली. जगभरात एकाच दिवशी झालेल्या लसीकरणाचा हा सर्वाधिक आकडा असेल, असे आरोग्यमंत्री म्हणाले. तसेच,गेल्या 24 तासांमध्ये देशात 36 लाख 91 हजार 511 लोकांना लसीकरण करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
लसींचा तुटवडा जाणवू लागल्याची तक्रार काही राज्यांकडून केली जात आहे. त्यासोबतच देशात लसींचा पुरवठा अपुरा असताना केंद्र सरकार परदेशात लसीचे डोस निर्यात करत असल्याची टीका देखील करण्यात आली. त्यावर आत्तापर्यंत परदेशात किती डोस निर्यात झाले, याचीही आकडेवारी आरोग्यमंत्र्यांनी सादर केली. आत्तापर्यंत भारताकडून कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींचे एकूण 6 कोटी 45 लाख डोस इतर देशांना निर्यात करण्यात आले आहेत. त्यामध्ये एकूण 84 देशांचा समावेश आहे.
देशातील आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना झालेल्या लसीकरणाची देखील माहिती डॉ. हर्ष वर्धन यांनी यावेळी दिली. 89 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. 54 लाख कर्मचाऱ्यांना दुसरा डोस मिळाला आहे. 98 लाख फ्रंटलाईन वर्कर्सला पहिला तर 45 लाख फ्रंटलाईन वर्कर्सला दुसरा डोस मिळाला आहे, असे ते म्हणाले.
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे, आत्तापर्यंत देशात 45 ते 60 या वयोगटातल्या 2 कोटी 61 लाख लोकांना पहिला तर 5 लाख 23 हजार लोकांना दुसरा डोस मिळाला आहे. त्याशिवाय, 60 पेक्षा जास्त वयाच्या 3 कोटी 75 लाख लोकांना पहिला तर 13 लाख लोकांना दुसरा डोस मिळाला आहे.