वेलिंग्टन – आधुनिक काळात दळणवळणा बाबत बहुतेक सर्व गोष्टी जरी बिनतारी प्रक्रियेमध्ये आल्या असल्या तरी विजेचे वहन मात्र अजूनही तारांच्या माध्यमातून केले जाते. पण आता बिनतारी पद्धतीने घराघरात वीज पोहोचवण्याच्या प्रयोगावर न्यूझीलंड मध्ये मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. नजीकच्या कालावधीमध्ये रस्त्यावर ठीकठिकाणी दिसणारे विजेचे खांब आणि तारा गायब झाल्या तर आश्चर्य वाटायला नको.
न्युझीलंड सरकार आणि एम रोड नावाचा एक स्टार्ट प्रकल्प हे दोघे मिळून या प्रकल्पावर काम करत आहेत. बिनतारी वीज पुरवठा हे जरी स्वप्नवत वाटत असले तरी येत्या वर्षातच या प्रकल्पातील काही प्रयोग पूर्ण केले जाणार आहेत प्रयोग शाळा पातळीवर या प्रकारचे प्रयोग यशस्वी झाले असल्याने प्रत्यक्ष व्यावहारिक पातळीवर हा प्रयोग कसा यशस्वी होतो हे आता पाहिले जाणार आहे.
न्यूझीलंडमधील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी असलेल्या पॉवर को या कंपनीच्या सहकार्याने एम रोड हा स्टार्ट प्रकल्प तांत्रिक गोष्टींचे प्रयोग सुरू करणार आहे. या दोन्ही कंपन्या मिळून एक मोठा अँटिना विकसित केला आहे या अँटिनाच्या माध्यमातून विजेच्या लहरी पाठवल्या जाण्याचा प्रयोग केला जाणार आहे. विजेच्या अति सूक्ष्म लहरी या अँटेनाच्या माध्यमातून सर्वत्र वितरित करण्याचा हा प्रयोग आहे.
एम रोड या स्टार्ट अपचे संस्थापक ग्रेट कुष्नेर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे न्युझीलॅंड सारख्या देशांमध्ये डोंगराळ भागामध्ये हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे. अशा प्रकारच्या तंत्रज्ञानावर खूप वर्षे चर्चा सुरू असली तरी आता ते प्रत्यक्षात येण्याच्या अशा समोर दिसत आहे वायरलेस इलेक्ट्रिसिटी सप्लायची कल्पना सर्वात प्रथम प्रख्यात वैज्ञानिक निकोला टेसला यांनी मांडली होती. 150 वर्षांपूर्वी त्यांनी याबाबत काही प्रयोगही केले होते. यांची ही संकल्पना आणि आधुनिक विज्ञान यांच्या साह्याने ही कल्पना आता प्रत्यक्षात येऊ शकते.